सिनभट्टी जंगलातील पोलिस - नक्षल चकमकीत कसनसूर दलमची डीव्हीसी जहाल नक्षली सृजनक्का ठार


- शासनाने तिच्यावर जाहीर केले होते १६ लाख रुपयांचे बक्षिस

- टीसीओसी सप्ताहात नक्षल्यांचा घातपाताचा उधळला कट

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यातील पोलीस उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या जारावंडी पोलीस मदत केंद्रातील सिनभट्टी जंगल परिसरात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये आज, २ मे रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास चकमक उडाली. यात कसनसून दलमची डीव्हीसी जहाल नक्षलवादी सृजनक्का ठार झाली. सदर महिला नक्षलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. मागील काही दिवस दडून बसलेल्या नक्षल्यांनी डोकेवर काढले. मात्र पोलिसांनी नक्षल्यांच्या मुसक्या आवळत एका नक्षल महिलेस कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्षलविरोधी अभियान पथकातील जवान (सी -६०) आज दुपारी एटापल्ली तालुक्यातील सिनभट्टी जंगल परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी देखील प्रतिउत्तरादाखल व स्वसंरक्षणार्थ नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला असता पोलिस जवानांच्या गोळीबाराचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलात पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी शोध घेतला असता एका महिला नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला. सदर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला व ओळख पटविली असता सदर मृतक जहाल महिला नक्षली आणि कसनसूर दलम डीव्हीसी सृजनक्का उर्फ चिनक्का उर्फ जैनी अर्का (४८) रा. गोपनार, लाहेरी ही असल्याची खात्री पटली. सृजनक्का ही भामरागड दलममध्ये सन १९८८ मध्ये दाखल झाली होती. तिच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला एकूण १४४ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शासनाने तिच्यावर एकूण १६ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले होते. त्याचबरोबर सदर घटनास्थळावरून १ एके ४७ रायफल, प्रेशर कुकर, क्लेमोर माईन व इतर नक्षल साहित्य मिळून आले. प्रेशर कुकर व क्लेमोर माईन हे घटनास्थळावर निकामी करण्यात आले. या ठिकाणी नक्षलवाद्यांनी कॅम्प उभारून टीसीओसी सप्ताहाच्या अनुषंगाने देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. गडचिरोली पोलिस दलाच्या सतर्कतेमुळे नक्षलवाद्यांचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. घटनेनंतर सदर जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सदर कामगिरी करणाऱ्या सी -६० च्या बहादूर जवानांचे कौतूक करत त्यांना रोख पारितोषिक जाहीर केले आहे. चकमकीत ठार झालेली महिला जहाल नक्षली सृजनक्का असल्याची माहिती आहे. सदर घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर सदर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-05-02


Related Photos