महत्वाच्या बातम्या

 ई-पीक नोंदणीअभावी शेतकरी अडचणीत : ३५० शेती गटांचे जिओ-फेन्सिंग रखडले


- शेतकऱ्यांचे गोरेगाव तहसीलदारांना निवेदन; २०२६-२७ हंगामातील खसरा नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन
- ई-पीक नोंदणीअभावी शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्रीचा प्रश्न निर्माण होण्याची भीती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : ई-पीक पाहणी नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे गोरेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गोरेगाव, घोटी, गहेलाटोला आणि जानाटोला येथील सुमारे ३५० शेती गटांचे मॅपवर जिओ-फेन्सिंग झाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी नोंदणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. परिणामी, आगामी काळात शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी गुरुवारी गोरेगाव तहसील कार्यालयात तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच ई-पीक नोंदणीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून सर्व शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गावांतील सुमारे ३५० शेती गटांचे मॅपवर जिओ-फेन्सिंग झालेले नाही. त्यामुळे या क्षेत्रातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करताना अडथळे येत आहेत. ई-पीक नोंदणी पूर्ण नसल्यास शासकीय धान खरेदी केंद्रांवर पीकविक्री करताना अडचणी येऊ शकतात. आधीच शेती उत्पादन आणि आर्थिक परिस्थितीच्या समस्यांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही बाब चिंताजनक ठरत आहे.

खसरा नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्याचे आश्वासन -
शेतकऱ्यांनी मांडलेल्या अडचणींची तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांनी दखल घेतली. सन २०२६-२७ या हंगामातील खसरा नोंदणी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच कोणताही शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, ज्या शेतकऱ्यांची नावे अद्याप नोंदणी प्रक्रियेत समाविष्ट झालेली नाहीत, त्यांनी विलंब न करता संबंधित तलाठ्यांशी संपर्क साधून आपले नाव आणि शेतीविषयक आवश्यक माहिती द्यावी, असे आवाहनही तहसीलदारांनी केले.

निवेदन देताना शेतकरी उपस्थित -
यावेळी तहसीलदार प्रज्ञा भोकरे यांना निवेदन सादर करताना वाय. बी. पटले, जगदीश येरोला, घनश्याम पटले, महाप्रसाद बीजेवार, कामराज पटले, प्रदीप डोंगरे आणि योगेश गौतम उपस्थित होते.ई-पीक नोंदणी आणि जिओ-फेन्सिंगचा प्रश्न तातडीने मार्गी लागल्यास शेतकऱ्यांना शासकीय धान खरेदी केंद्रांवर धान विक्री करताना उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी दूर होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सर्व संबंधित शेती गटांचे जिओ-फेन्सिंग आणि शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos