अजब-गजब विचारमंचाच्या सांज मैफिलीत स्वरांचे दिवे उजळले!


- हर्षद-दुहिताच्या सुरेल जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध; सन्मिता धापटे-शिंदे यांच्या गायनाने मैफिलीला रंगत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : दिवाळीच्या प्रकाशपर्वात सर्वत्र दिव्यांची रोषणाई आणि उत्साहाचे वातावरण असताना गडचिरोलीत अजब-गजब विचारमंचाच्या सांज मैफिलीत सप्तसुरांचे दिवे उजळले. इंडियाज गॉट टॅलेंट फेम गायक हर्षद गोळेसर आणि गायिका दुहिता गोळेसर या सुरेल जोडीने आपल्या अनोख्या आणि लाघवी गायनशैलीत एकापेक्षा एक अवीट गोडीची गीते सादर करून गडचिरोलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या सुरेल जुगलबंदीला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
दिवाळी उत्सवाचे औचित्य साधून गडचिरोलीतील अजब-गजब विचारमंच च्या वतीने यंदाही संगीत महोत्सव २०२६ (पर्व - १३) चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवांतर्गत दोन विशेष सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यातील पहिली दीपावली सांध्य मैफिल गुरुवारी ५ सायंकाळी स्थानिक विद्याभारती कन्या हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात पार पडली.
मैफिलीची सुरुवात गणनायका, गजमुखा आणि शंकर संकट हरणा या भक्तिपर वंदनेने झाली. त्यानंतर हर्षद आणि दुहिता यांनी आपल्या गायनाचा सुरेल प्रवास सुरू केला. सखी मंद झाल्या तारका, शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातूनी, या जगण्यावर, या जन्मावर शतदा प्रेम करावे, नको करू सखी असा साजरा शृंगार, लाजून हसणे अन् हासून ते पाहणे, लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो आणि पाहिले न मी तुला तू मला न पाहिले यांसारख्या लोकप्रिय गीतांनी मैफिलीला रंगत आणली. प्रत्येक गीतानंतर रसिकांकडून टाळ्यांचा कडकडाट होत होता.
हर्षद गोळेसर हे नाशिकचे, तर दुहिता गोळेसर या मुंबईच्या आहेत. आठ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विवाहबंधनात अडकलेल्या या सुरेल दाम्पत्याने गायनातील समन्वय आणि एकमेकांना पूरक अशी शैली सादर करून रसिकांची मने जिंकली. ‘हाय रामा ये क्या हुआ, जीव रंगला दंगला, नयना ठग लेंगे, रमता जोगी, गोमू माहेरला जाते हो नाखवा आणि मी डोलकर डोलकर या गीतांच्या सादरीकरणाला प्रेक्षकांनी मनमुराद दाद दिली. विशेषतः दोघांची जुगलबंदी रसिकांच्या पसंतीस उतरली.
सन्मिता धापटे-शिंदे यांच्या सुरांचा मोहक आविष्कार -
या मैफिलीचे आणखी एक आकर्षण ठरले ते सूर नवा ध्यास नवा या संगीत स्पर्धेच्या विजेत्या प्रख्यात गायिका सन्मिता धापटे-शिंदे यांचे गायन. त्यांनी मोजकीच गीते सादर केली. मात्र आपल्या खास शैलीतून रसिकांना सुरांची अनोखी मेजवानी दिली. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए ही गझल, रेशमाच्या रेघांनी ही लावणी, अंबाबाईचा गोंधळ हे भक्तिगीत, मेरे ढोलना सुन हे वेगळ्या धाटणीचे गीत आणि सैराट झालं जी या गीतांच्या सादरीकरणाने मैफिलीत विशेष रंग भरले. त्यांच्या गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन किशोर गलांडे आणि आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले. त्यांच्या ओघवत्या आणि रंजक निवेदनामुळे कार्यक्रमाला अधिकच रंगत आली.या संगीत महोत्सवाच्या आयोजनासाठी अजब-गजब विचारमंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, चेतन गोरे, दत्तू सूत्रपवार, सुभाष धंदरे, सतीश विधाते, प्रवीण खडसे, विश्राम होकम, अरविंद कात्रटवार, तन्मय त्रिनगरीवार, डॉ. चेतन कोवे, सतीश चिचघरे, डॉ. नागुलवार, अंकित गव्हारे, पराग वासेकर, पुरुषोत्तम ठाकरे, प्रतीक बारशिंगे, मिलिंद उमरे आणि नंदकिशोर काथवटे यांच्यासह संपूर्ण चमूने सहकार्य केले.
दिवाळीच्या दिव्यांसोबतच स्वरांच्या दिव्यांनीही गडचिरोलीचे सांस्कृतिक वातावरण उजळून निघाले. सुरेल गीते, कलाकारांची प्रभावी जुगलबंदी आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही सांज मैफल अविस्मरणीय ठरली, अशी भावना उपस्थित रसिकांनी व्यक्त केली.




Petrol Price




