पोहणा येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर कार्यशाळा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : आरोग्य विभागाच्या माझे गाव, आरोग्य संपन्न गाव या महत्त्वाकांक्षी अभियानांतर्गत कस काय मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पोहणा येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवा विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच गुणवतापूर्ण, सर्वसमावेशक, सुलभ आणि लोकाभिमुख आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला
अधिक उपचार, कमी रेफरल ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक यांच्या संकल्पनेतून हा प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजसिंह पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलिनी विखे, जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या पवार तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशिक्षण पथक वैद्यकीय अधिकारी डॉ.चांडोळकर यांच्या मार्गदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान माझे गाव आरोग्य संपन्न गाव, माता व बाल आरोग्य, लसीकरण, सिकलसेल, कुष्ठरोग, असंसर्गजन्य आजारांचे सर्वेक्षण व तपासणी, उच्च जोखमीच्या मातांची ओळख, आरोग्य सेवा गुणवत्तावाढ आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उपलब्ध आरोग्य सेवांचा प्रभावी वापर, नोंदी व अहवाल अद्ययावत ठेवणे आणि प्रलंबित बाबींची पूर्तता करण्याबाबतही प्रशिक्षण देण्यात आले.
आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आशा स्वयंसेविका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून नागरिकांना गाव पातळीवरच आवश्यक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.




Petrol Price




