गावस्तरीय आरोग्य कर्मचारी हे जिल्हयातील खरे फ्रंटलाईन वॉरीअर्स : जिल्हाधिकारी दीपक सिंगला


- २ हजार २८० कर्मचारी, १९ हजार ५०० प्रवाशी तर सलग १४ दिवस तपासणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
कोरोना संसर्गाच्या धर्तीवर गडचिरोली जिल्हयात बाहेरून आलेल्या प्रवाशांची शोध मोहिम जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात आली. राज्यात संचार बंदी लागू झाल्यापासून आत्तापर्यंत १९ हजार ५०० प्रवाशांची नोंद जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आली. यातील प्रत्येक प्रवाशाची दैनंदिन तपासणी गावस्तरीय आशा तसेच आरोग्य सेवकांनी केली. खऱ्या अर्थाने ते कोराना संसर्ग तपासणीतील फ्रंटलाईन वॉरीअर्स आहेत असे म्हणता येईल. या प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेण्यासाठी २२८० आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावस्तरावर मोहिम राबवून प्रत्येक प्रवाशाचे १४ दिवस निरीक्षण नोंदविले. या २ हजार २८० फ्रंटलाईन वर्कर्सनी खऱ्या  अर्थाने गडचिरोली कोरोनामुक्तीसाठी महत्त्वाचे योगदान दिले असे म्हणता येईल. जिल्हयातील हे कोरोना वॉरीअर्स अजूनही आपली सेवा प्रत्येक गावात बजावत आहेत. आजही क्वारंटाईनचा १४ दिवस कालावधी न संपलेल्या जिल्हयातील २ हजार २५० प्रवाशांची दैनंदिन निरीक्षणे घेणे सुरू आहे.
आत्तापर्यंत बाहेरून जिल्हयात आलेल्या १९ हजार ५०० प्रवाशांपैकी १७ हजार २२० प्रवाशांचे १४ दिवसांचे निरीक्षण पुर्ण झाले आहे. यातील काही लोकांना खोकला, ताप किंवा श्वसनास त्रास झाल्याने तसेच प्रवाशांनी आरोग्य विभागाच्या निर्देशांचे पालन न केल्याने ४६८ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन केले गेले. यातील संभाव्य ११३ लोकांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले. त्यातील ९४ प्रवाशांना आजपर्यंत घरी सोडण्यात आले आहे. वैद्यकीय निगराणीखाली ठेवलेल्या ११३ पैकी  ७८ लोकांचे कोरोना संसर्ग तपासणीसाठी नमुने घेण्यात आले. त्यातील ६९ नमुने निगेटीव्ह तर ९ अहवाल अजून येणे बाकी आहेत.
 फ्रंटलाईन वॉरीअर्स संसर्ग काळातील महत्त्वाचा दुवा : गावस्तरावर अगदी सामान्य लोकांमध्ये आरोग्य विषयक सेवा देणारे हे फ्रंटलाईन योद्धे कोरोना संसर्ग आपतकालीन स्थितीत महत्त्वाची भूमिका बजावित आहेत. आशा, आरोग्य सेवक तसेच एएनएम यांचा समावेश या फ्रंटलाईन वर्कर्समध्ये होतो. गावागावात आरोग्य विषयक जनजागृती व सेवा देणे हे त्यांचे काम. कोरोनामुळे या वॉरीअर्सना मोठया प्रमाणात प्रत्येक गावात प्रत्येक प्रवाशाला व त्यांच्या आरोग्य विषयक हालचालींना तपासावे लागते. यावेळी त्यांच्याकडून सामान्यांना आरोग्य विषयक संदेश व अचूक माहितीही दिली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय रोठोड यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणा-या गावांमध्ये सुक्ष्मस्तरावर नियोजन करून भेटींबात आराखडे तयार केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी डॉ.विनोद मशाखेत्री यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले. यातून त्यांनी गावस्तरावरील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. यामध्ये ऑनलाईन प्रशिक्षणाचाही समावेश करण्यात आला. गुगल स्प्रेडशीटचा वापर करून फ्रंटलाईन वर्कर्सपर्यंत माहिती पोहचविण्यात आली. 
जिल्हयातील ४८ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७६ उपकेंद्र, १२ ग्रामीण व उपजिल्हा रूग्णालये तर १ जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्वच आरोग्य अधिकारी व कर्मचारी सद्या कोरोनाबाबत आपली सेवा देत आहेत. जिल्हा कोरोनामुक्त राहण्यासाठी पोलीस प्रशासनाबरोबरच आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. जिल्हयातील प्रत्येक संभावित रूग्णाची तपासणी करणे, क्वारंटाईन करणे, लोकांना अचूक माहिती देणे यातूनच आज गडचिरोली कोरोना मुक्त जिल्हा म्हणून ओळखला जात आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2020-04-25


Related Photos