महत्वाच्या बातम्या

 अज्ञात वाहनाच्या धडकेत २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू


- तिरोडा-साकोली मार्गावरील सर्रा गेटसमोरील घटना; अपघातानंतर वाहनचालक फरार, तिरोडा पोलिसांत गुन्हा दाखल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना ३ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० ते २.४७ वाजताच्या दरम्यान तिरोडा-साकोली मार्गावरील सर्रा गेटसमोर घडली. शिवम निर्मलराव मडावी २४, रा. चोरखमारा, ता. तिरोडा, जि. गोंदिया असे मृत तरुणाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिवम मडावी हा दुचाकीने तिरोडा रेल्वे स्थानकावरून आपल्या चोरखमारा येथील घरी जात होता. दरम्यान, तिरोडा-साकोली मार्गावरील सर्रा गेटसमोर पोहोचला असता एका अज्ञात वाहनचालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून शिवमच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या धडकेमुळे शिवम दुचाकीसह रस्त्यावर कोसळला. अपघातात त्याच्या डोक्याच्या मागील भागाला गंभीर दुखापत झाली. या गंभीर दुखापतीमुळे त्याचा मृत्यू झाला. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून एका तरुणाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने चोरखमारा परिसरात शोककळा पसरली आहे.

या प्रकरणी ३ नोव्हेंबर रोजी तिरोडा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २८१, १०६(१) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ आणि १३४ (अ), (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम नष्टे करीत आहेत.





  Print






Related Photos