गांधी-शास्त्री जयंतीनिमित्त गडचिरोली पोलीस दलाचा ५० हजार वृक्षलागवडीचा संकल्प : सायबर सुरक्षेचीही घेतली प्रतिज्ञा


- जिल्ह्यातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या स्तरावर वृक्षलागवड; नागरिकांना पर्यावरण संवर्धनासह सायबर सुरक्षेचा संदेश
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाने पर्यावरण संवर्धन आणि सायबर सुरक्षा या दोन्ही विषयांना केंद्रस्थानी ठेवत विविध उपक्रम राबविले. ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेला हातभार लावत गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील ७० पोलीस ठाणे, उपपोलीस ठाणे व पोलीस मदत केंद्रांच्या स्तरावर तब्बल ५० हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प केला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली २ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथील पोलीस कवायत मैदान परिसरात पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या उपस्थितीत वृक्षलागवड करण्यात आली. यावेळी पर्यावरण संवर्धनासोबतच नागरिकांमध्ये वाढत्या सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती करण्याचा संदेशही देण्यात आला.
जिल्हाभर ५० हजार वृक्षांची लागवड -
राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, या व्यापक अभियानाला गडचिरोली पोलीस दलानेही सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त पोलीस कवायत मैदान परिसरात पोलीस अधिकारी व अंमलदारांनी वृक्षारोपण केले. त्याचबरोबर जिल्ह्यातील ७० पोस्टे, उपपोस्टे व पोमकेंच्या स्तरावर ५० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली.
वृक्षलागवड ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन आणि संगोपन करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचे पोलीस दलाने स्पष्ट केले. पर्यावरण संवर्धनातून हरित, निरोगी आणि सुरक्षित समाजनिर्मितीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
सायबर गुन्ह्यांविरोधात पोलिसांची सायबर प्रतिज्ञा -
दरम्यान, सध्याच्या डिजिटल युगात इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्याचबरोबर नागरिकांना लक्ष्य करून सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीच्या नवनवीन पद्धतींचा वापर केला जात आहे.
केवायसीच्या नावाखाली फसवणूक, बनावट शेअर ट्रेडिंग, ऑनलाइन कर्जाचे आमिष, बनावट खरेदी संकेतस्थळे, बनावट कस्टमर केअर क्रमांक, एपीके फाईल्स, फिशिंग, सोशल मीडिया हॅकिंग, बनावट नोकरीच्या ऑफर तसेच डिजिटल अरेस्टच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना सायबर साक्षर करण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलातर्फे १ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सायबर जनजागृती महिना आयोजित करण्यात आला आहे.
या मोहिमेच्या अनुषंगाने २ ऑक्टोबर रोजी पोलीस कवायत मैदानावर पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी सायबर प्रतिज्ञा घेतली. सुरक्षित डिजिटल व्यवहार, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण आणि नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
वृक्षलागवड करा, वृक्षसंवर्धन करा; सायबर सुरक्षेबाबतही सजग राहा -
या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरण संवर्धन आणि डिजिटल सुरक्षितता या दोन्ही बाबींचे महत्त्व पटवून देण्यात आले. वृक्षलागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम न राहता नागरिकांनी लागवड केलेल्या वृक्षांचे संगोपन करावे, पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन पोलीस दलाने केले.
त्याचप्रमाणे ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक खबरदारी घेणे, संशयास्पद लिंक किंवा फाईलवर क्लिक न करणे, अनोळखी व्यक्तींना बँकिंग अथवा वैयक्तिक माहिती न देणे आणि सायबर फसवणुकीच्या घटनांबाबत तत्काळ संबंधित यंत्रणेशी संपर्क साधणे, याबाबतही नागरिकांना जागरूक करण्यात येत आहे.
अधिकारी-अंमलदारांची उपस्थिती -
या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) शैलेंद्र ठाकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने गडचिरोली पोलीस दलाने पर्यावरण संवर्धन आणि सायबर सुरक्षा या दोन महत्त्वाच्या विषयांना जोडत ‘हरित समाज आणि सुरक्षित डिजिटल समाज’ निर्मितीचा संदेश दिला.




Petrol Price




