महत्वाच्या बातम्या

 वैरागड परिसरात रानटी हत्तींचा धुडगूस : ७० ते ८० पोती धानाची नासधूस


- अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान; वर्षभराची मेहनत वाया, शेतकरी आर्थिक संकटात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वैरागड : हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची वेळ वैरागड परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. मोठ्या कष्टाने पिकविलेले धानपीक काढणीच्या आणि मळणीच्या टप्प्यात असतानाच रानटी हत्तींच्या कळपाने शेतशिवारात धुडगूस घातला. शनिवारी रात्रीच्या सुमारास वैरागड परिसरात दाखल झालेल्या हत्तींच्या कळपाने दोन शेतकऱ्यांच्या जवळपास ७० ते ८० पोती धानाची नासधूस केली. तसेच इतर शेतकऱ्यांच्या धानाच्या गंजी उपसून फेकल्या आणि उभ्या पिकांचेही मोठे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

कुरखेडा तालुक्याच्या दिशेने गेलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा वैरागड परिसराकडे मोर्चा वळविला आहे. शनिवारी रात्री या कळपाने शेतशिवारात प्रवेश करून पिकांची नासधूस केली. वैरागड येथील शेतकऱ्यांनी दिवसरात्र मेहनत घेऊन धानपीक उभे केले होते. काही शेतकऱ्यांनी हार्वेस्टरच्या साहाय्याने धानाची मळणी करून ते पोत्यांमध्ये भरून ठेवले होते, तर काहींचे धानपीक कापणीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, हत्तींच्या अचानक झालेल्या प्रवेशामुळे शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले.

अनेक शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान -
हत्तींच्या कळपाने छाया लांजीकर आणि सचिन लांजीकर यांच्या शेतात मळणी करून पोत्यांमध्ये भरून ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. त्यांच्या जवळपास ७० ते ८० पोत्यांतील धानाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याशिवाय सुरेश शेंदरे यांच्या मळणी करून ठेवलेल्या धानाचीही हत्तींनी नासधूस केली.

तसेच विलास बोदले, मनोहर बनकर आणि राजेंद्र कांबळे यांच्या शेतातील धानाच्या पुंजण्यांचे नुकसान केले. तर विठ्ठल बारसागडे, भक्तदास बारसागडे, नरेश शेंदरे, रवी दुमाने आणि सुधाकर जुवारे यांच्या शेतातील उभ्या धानपिकालाही हत्तींच्या कळपाने मोठा फटका दिला. एकाच रात्री अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत आहेत.

वर्षभराची मेहनत वाया; कर्जफेड आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न -
आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशातच हत्तींच्या कळपाने धानपिकाची नासधूस केल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. वर्षभर काबाडकष्ट करून पिकविलेले धान हातात येण्याच्या वेळीच नष्ट झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे.

शेतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा आणि आगामी हंगामासाठी आर्थिक तरतूद कशी करायची, असे प्रश्न नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे हत्तींच्या या उपद्रवामुळे केवळ पिकांचेच नव्हे, तर शेतकऱ्यांच्या संपूर्ण आर्थिक नियोजनाचेही नुकसान झाले आहे.

वन विभागाने तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी -
वैरागड परिसरात रानटी हत्तींच्या कळपाचा वावर पुन्हा वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींचा कळप कधी आणि कोणत्या शेतात धुडगूस घालेल, याची शाश्वती नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करणेही कठीण झाले आहे.

वन विभागाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतांची तातडीने पाहणी करावी. प्रत्यक्ष पंचनामे करून नुकसान निश्चित करावे आणि शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी. तसेच हत्तींच्या हालचालींवर नियमित लक्ष ठेवून त्यांच्या उपद्रवावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

धानपीक हातात येण्याच्या ऐन हंगामात हत्तींच्या कळपाने घातलेल्या धुडगुसामुळे वैरागड परिसरातील शेतकरी हवालदिल झाले असून, आता वन विभागाकडून तातडीच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






Related Photos