महत्वाच्या बातम्या

 विजयादशमीला विसापुरात रक्तदान शिबिर : आदर्श युवक शारदोस्तव मंडळाचा स्तुत्य उपक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : विजयादशमीच्या शुभपर्वाचे औचित्य साधून तालुक्यातील विसापूर येथील आदर्श युवक शारदोस्तव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत मानवसेवेचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या अंजलीताई पंदीलवार, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष किशोर पंदीलवार, गजानन पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य सूरज टोमटे, सामाजिक कार्यकर्ते महेश तुराणकर आणि विलास भोयर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात सविताताई डाहुले, विलास भोयर आणि प्रशांत गिरडकर यांनी रक्तदान करून सामाजिक कार्यात सहभाग नोंदविला. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यास त्यांचे प्राण वाचविण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदानासारखे समाजोपयोगी उपक्रम राबविणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

यावेळी अंजलीताई पंदीलवार यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. विजयादशमीसारख्या मंगलपर्वावर रक्तदान शिबिर आयोजित करणे ही समाजहिताची बाब असून, मंडळाने भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष दीपक टोमटे यांच्यासह मयूर नागपुरे, प्रणय तुराणकर, पियुष नाकाडे, मयूर परसूटकर आणि मंडळाच्या इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. विजयादशमीच्या पर्वावर आयोजित या रक्तदान शिबिरातून आदर्श युवक शारदोस्तव मंडळाने सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला असून, मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.






  Print






Related Photos