महत्वाच्या बातम्या

 पोंभुर्णा येथे महिला व बालकांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महिला व बालकांचे संरक्षण, त्यांचे हक्क, सुरक्षितता आणि सक्षमीकरण याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ३० ऑक्टोबर रोजी पंचायत समिती पोंभुर्णा येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर आणि चाइल्ड हेल्पलाइनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सेवांची माहिती अंगणवाडी सेविकांना देण्यात आली.

या कार्यक्रमाला तालुक्यातील सुमारे १५० महिला व अंगणवाडी सेविकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी भस्मे, परिविक्षा अधिकारी अतीश चव्हाण, कनिष्ठ संरक्षण अधिकारी पंछीमारे, गटविकास अधिकारी वाढई, अंगणवाडी पर्यवेक्षिका शेरकी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मीनाक्षी भस्मे यांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाल संरक्षण कक्ष, बाल संगोपन योजना, अनाथ प्रमाणपत्र योजना, चाइल्ड हेल्पलाइन, सखी वन स्टॉप सेंटर आणि महिला हेल्पलाइन १८१ यांसह विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.

सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रभारी केंद्र प्रशासक कल्याणी रायपूरे यांनी संकटात सापडलेल्या महिला व मुलींना केंद्रामार्फत उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सेवा, समुपदेशन आणि मदतीची माहिती दिली. तसेच सोशल मीडियाचे दुष्परिणाम, स्वाधार केंद्र, नोकरदार महिलांसाठीचे वसतिगृह आणि कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH Act) याबाबत मार्गदर्शन केले.

चाइल्ड हेल्पलाइनच्या केस वर्कर किरण पंकज बोहरा यांनी ० ते १८ वर्षे वयोगटातील संकटग्रस्त बालकांना मदत करण्यासाठी २४ तास कार्यरत असलेल्या १०९८ या हेल्पलाइनची कार्यपद्धती समजावून सांगितली. बालमजुरी आणि बालविवाह यांसारख्या सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची माहिती देत अशा घटना निदर्शनास आल्यास तातडीने संबंधित यंत्रणेला कळविण्याचे आवाहन केले.

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा मळावी यांनी ग्रामीण भागातील महिला व बालकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यात अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. महिला व बालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन व मदत मिळवून देण्यासाठी सेविकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. किशोरवयीन मुलींना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून देणे, त्यांचा मानसिक विकास घडविणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्याच्या महत्त्वावरही त्यांनी भर दिला.

कार्यक्रमात बाल संरक्षण यंत्रणेची रचना, बालकांच्या हक्कांसाठी असलेले प्रमुख कायदे, शासनाच्या विविध योजना आणि महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी उपलब्ध असलेल्या मदत यंत्रणांची माहिती देण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण विकासात मुला-मुलींची भूमिका महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या शिक्षणासोबतच सुरक्षिततेकडेही विशेष लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.





  Print






Related Photos