विनापरवाना रेती वाहतूक : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


- कुर्झा-वासेळा मार्गावर पोलिसांची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉलीसह ७ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्झा ते वासेळा मार्गावर विनापरवाना रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती असा एकूण ७ लाख ६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजताच्या दरम्यान पोलिस हवालदार रोशन फळणीकर हे पोलिस पथकासह गस्तीवर होते. यावेळी कुर्झा शिवारात विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर-ट्रॉली संशयास्पद स्थितीत आढळून आला. तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे एक ब्रास रेती असल्याचे निदर्शनास आले. रेती वाहतुकीसाठी आवश्यक परवाना नसल्याचे आढळल्याने पोलिसांनी संबंधित वाहनावर कारवाई केली.
या प्रकरणात रूपेश रतिराम मानकर ३२ वर्ष आणि ट्रॅक्टरमालक विशाल रामू कुलूरकर २६ वर्ष , दोघेही रा. कुर्झा, यांच्याविरुद्ध पवनी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेतीची एकूण किंमत ७ लाख ६ हजार रुपये असल्याची माहिती आहे.
विनापरवाना रेती वाहतुकीच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून गस्त आणि तपासणी केली जात असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पवनी पोलिस करीत आहेत.




Petrol Price




