आष्टी टी-पॉइंटवर गोवंश तस्करीचा पर्दाफाश : १७ गोवंशाची सुटका


- पोलिसांच्या कारवाईत ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त; चालक वाहन सोडून फरार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : नागपूर-अमरावती महामार्गावरून सुरू असलेल्या अवैध गोवंश तस्करीविरोधात तळेगाव पोलिसांनी महत्त्वपूर्ण कारवाई करत १७ गोवंशांची सुटका केली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत गोवंश वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिकअप वाहनासह एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र, पोलिसांचा पाठलाग सुरू होताच वाहनचालकाने वाहन रस्त्याखाली उतरवून झाडीझुडपांचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
प्राप्त माहितीनुसार, तळेगाव पोलिसांना नागपूरकडून अमरावतीच्या दिशेने पिकअप वाहनातून अवैधरीत्या गोवंशाची वाहतूक केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आष्टी टी-पॉइंट येथे नाकेबंदी करून वाहनांची तपासणी सुरू केली. दरम्यान, नागपूरकडून अमरावतीकडे जाणारे पांढऱ्या रंगाचे एमएच २९ बीडी ३३५१ क्रमांकाचे पिकअप वाहन पोलिसांना दिसले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने वाहन न थांबवता वेगाने पुढे पळविले.
यावेळी पोलिसांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात येताच चालकाने भिष्णूर फाट्याजवळ पिकअप वाहन रस्त्याच्या खाली उतरवले. त्यानंतर वाहन सोडून जवळील झाडीझुडपांचा आधार घेत तो घटनास्थळावरून फरार झाला.
पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये १७ गायी अत्यंत निर्दयीपणे कोंबून ठेवल्याचे आढळून आले. या जनावरांचे पाय बांधण्यात आले होते. त्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पोलिसांनी तातडीने सर्व १७ गोवंशांची सुटका करून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने गोरक्षण केंद्रात पाठविले.
या कारवाईत पोलिसांनी ८० हजार रुपये किमतीचे १७ गोवंश आणि अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन असा मुद्देमाल जप्त केला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ३ लाख १० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, नागपूर-अमरावती महामार्गावरून गोवंशाची अवैध वाहतूक वाढत असल्याचे चित्र आहे. दिवसा तसेच रात्रीच्या वेळी विविध मार्गांचा वापर करून गोवंशाची वाहतूक केली जात असल्याने या प्रकाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
अशा तस्करीविरोधात पोलिसांनी अधिक सतर्क राहून नियमित गस्त आणि नाकेबंदी वाढविण्याची गरज व्यक्त होत आहे.या प्रकरणातील फरार वाहनचालकाचा शोध घेण्याचे तसेच गोवंश तस्करीमागील साखळी उघड करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.




Petrol Price




