सेवा संकल्प अभियानातून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले कृषी तज्ज्ञ

- विविध तालुक्यांत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : सेवा संकल्प अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांच्यावतीने जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शेतकरी मार्गदर्शन व थेट बांधावर पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषीविषयक योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ चमूकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.
कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख व संचालक (विस्तार शिक्षण) डॉ. धनराज उंदिरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या समन्वयातून जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञ चमूने कारंजा तालुक्यातील मोर्शी, मालेगाव, देवळी तालुक्यातील दिघी, बोपापूर, हिंगणघाट तालुक्यातील मोझरी शेकापूर, आष्टी तालुक्यातील आनंदवाडी, चिस्तूर, आर्वी तालुक्यातील खरांगणा, मोरांगना, समुद्रपूर तालुक्यातील बावापूर, हरणखुरी, सेलू तालुक्यातील किन्ही-मोही तसेच वर्धा तालुक्यातील आमला या गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती दिली.
कृषिविद्या विषयतज्ज्ञ डॉ. भारती तिजारे यांनी पीक उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक पीक लागवड तंत्रज्ञान तसेच अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. निलेश वझिरे यांनी सोयाबीन, तूर व कपाशी पिकांवरील कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर तसेच आवश्यक फवारणीबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कृषी अभियांत्रिकी विषयतज्ज्ञ डॉ. सविता पवार यांनी आधुनिक कृषी अवजारांचा वापर, पाणी व मृदासंवर्धनासाठी रुंद वरंबा-सरी पद्धतीचे महत्त्व तसेच ड्रोनच्या माध्यमातून फवारणी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत माहिती दिली. पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विषयतज्ज्ञ डॉ. सचिन मुळे यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, मुरघास निर्मिती व अझोला निर्मिती तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले.
गृहविज्ञान विषयतज्ज्ञ डॉ. प्रेरणा धुमाळ यांनी कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी घराच्या अंगणात पोषण बाग उभारण्याचे महत्त्व तसेच दैनंदिन आहारात औषधी वनस्पतींचा समावेश करण्याबाबत शेतकरी महिलांना मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी केवळ सभागृहातील मार्गदर्शनापुरते मर्यादित न राहता थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकांची पाहणी केली. सोयाबीन, कापूस व तूर पिकांवरील कीड-रोगांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतातील परिस्थितीनुसार तात्काळ व प्रभावी उपाययोजना सुचविण्यात आल्या. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या प्रत्यक्ष अडचणींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळण्यास मदत झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विस्तार शिक्षण विषयतज्ज्ञ डॉ. अंकिता अंगाईतकर यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कृषी विभागाचे विशाल मंगळे, प्रियंका ताकसांडे, सुनील हिवसे, राजेश चांदेवार, प्रणव मोरे, वेलस्पन फाउंडेशनचे दीपक लढी तसेच प्रगतिशील शेतकरी निलीमा अक्कलवार, दीपक बर्डे, प्रशांत भोयर व किशोर कुडमेथे यांनी सहकार्य केले.




Petrol Price




