महत्वाच्या बातम्या

 वाहन परवान्यासाठी सारथी ४.० प्रणालीवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक : ई-रिक्षा, ई-कार्टसह विविध सेवांच्या नियमांत बदल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा :
वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्तीशी (ड्रायव्हिंग लायसन्स) संबंधित विविध सेवांसाठी अर्ज करताना सारथी ४.०  या संगणक प्रणालीवर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील तरतुदींनुसार १५ ऑक्टोबर २०२६ पासून या प्रक्रियेत बदल लागू करण्यात आले आहेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली येथील संचालकांसोबत १६ जुलै रोजी झालेल्या चर्चेनुसार, विद्यमान अनुज्ञप्तीवरील सेवांसाठी अर्ज करताना मूळ वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती, शिकाऊ अनुज्ञप्ती किंवा वाहक अनुज्ञप्ती अपलोड करण्याची अट हटविण्यात आली आहे. हा बदल सर्व राज्यांमध्ये लागू करण्यात आला आहे.

ई-रिक्षा आणि ई-कार्टसाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक -
ई-रिक्षा किंवा ई-कार्ट वर्गातील वाहनांसाठी नवीन अनुज्ञप्ती अथवा अतिरिक्त वाहन वर्गाची नोंदणी करण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वाहन प्रशिक्षण संस्थेकडून किंवा ई-रिक्षा व ई-कार्ट व्यवसायाचे प्रमाणपत्र असलेल्या अधिकृत वाहन विक्रेत्याकडून किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

ई-रिक्षा किंवा ई-कार्ट परिवहन संवर्गातील नवीन अनुज्ञप्तीसाठी अर्ज करताना नमुना १-अ (Form १A) अपलोड करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच, परिवहन संवर्गातील कोणत्याही वाहन वर्गासाठी अतिरिक्त वाहन वर्गाची नोंदणी करताना लागू असलेल्या नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

अनुज्ञप्ती नूतनीकरणासाठी उजळणी प्रशिक्षण प्रमाणपत्र -
वाहन चालविण्याच्या अनुज्ञप्तीचे पुर्न:वेध (Revalidation) करण्यासाठी अतिरिक्त उजळणी प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच, निलंबित अनुज्ञप्तीवरील निलंबन उठविण्यासाठी अर्ज करतानाही उजळणी प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्व अनुज्ञप्तीधारक तसेच नवीन अनुज्ञप्तीसाठी अर्ज करणाऱ्या नागरिकांनी सारथी ४.० प्रणालीवर आवश्यक कागदपत्रे अद्ययावत करावीत. अर्जदारांनी संबंधित नियमांनुसार कागदपत्रे सादर केल्यानंतर अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांकडून अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे यांनी कळविले आहे.

 





  Print






Related Photos