फॉर्च्युनरच्या आड दारूचा काळा धंदा : भद्रावतीत २५ लाखांची कार अन् ३८ हजारांची विदेशी दारू जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : आलिशान फॉर्च्युनर कारच्या आडून विदेशी दारूच्या अवैध विक्रीचा धंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार भद्रावतीतील किल्ला वार्डात उघडकीस आला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३८ हजार ९४० रुपयांची विदेशी दारू आणि तब्बल २५ लाख रुपये किमतीची फॉर्च्युनर कार, असा एकूण २५ लाख ३८ हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
२ ऑक्टोबर रोजी भद्रावती शहर परिसरात अवैध धंद्यांविरोधात पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना किल्ला वार्ड परिसरात साधना अशोक वानखेडे (वय ५५) ही महिला चेतन पारेकर याच्या मदतीने विदेशी दारूचा साठा करून विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली.
पोलिसांचे पथक घराजवळ पोहोचताच एक महिला आणि पुरुष पैसे घेऊन दारू विक्री करताना दिसून आले. मात्र पोलिसांची चाहूल लागताच पुरुष इसमाने अंधाराचा फायदा घेत धूम ठोकली. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही. दुसरीकडे महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने साधना वानखेडे हिला ताब्यात घेण्यात आले. घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना बेडखाली तसेच घराच्या आवारात उभ्या असलेल्या फॉर्च्युनर कारमध्ये विविध ब्रँडची विदेशी दारू आढळून आली. मॅजिक मोमेंट, इम्पीरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, आयकॉनिक व्हाईट, मॅकडॉवेल्स, ग्रँड मास्टर्स, रॉयल ग्रीन यासह विविध ब्रँडच्या दारूच्या बाटल्या पाहून पोलिसही चक्रावले.
या कारवाईत ३८ हजार ९४० रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली. दारूचा साठा करण्यासाठी वापरलेली टोयोटा फॉर्च्युनर क्रं एमएच २२ एएम ८८५५ पोलिसांनी ताब्यात घेतली. या वाहनाची किंमत सुमारे २५ लाख रुपये आहे. त्यामुळे कारवाईतील एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २५ लाख ३८ हजार ९४० रुपये इतकी झाली.
प्रभारी अधिकारी पोलीस उपअधीक्षक सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, गोपाल आतकुलवार, देवानंद डुकरे आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी साधना वानखेडे हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कारवाईदरम्यान पसार झालेल्या चेतन पारेकर याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.




Petrol Price




