महत्वाच्या बातम्या

 कापसाचा विमा कधी मिळणार? ९८८ शेतकरी प्रतीक्षेत


 अतिवृष्टी आणि कीडरोगामुळे नुकसान; वर्ष उलटूनही भरपाई नाही, १,०९० हेक्टरवरील कापूस विम्याच्या प्रतीक्षेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / गडचिरोली : खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि कीडरोगांमुळे कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यातील अहेरी, चामोर्शी आणि सिरोंचा या तीन तालुक्यांतील तब्बल ९८८ कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केला होता. या माध्यमातून १ हजार ९०.२६ हेक्टर कापूस क्षेत्राला विमा संरक्षण मिळाले. मात्र, हंगाम उलटूनही विमा मंजुरीची यादी कृषी विभागाला प्राप्त झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि हवामानातील बदलांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला जातो. त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनीही विमा संरक्षण घेतले होते. मात्र, नुकसान होऊनही भरपाई मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शेतीसाठी केलेला खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीचा आर्थिक भार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेची प्रतीक्षा आहे.

सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांची नोंदणी -
कृषी विभागाच्या पीक विमा नोंदणी अहवालानुसार, तीन तालुक्यांमध्ये एकूण ९८८ शेतकऱ्यांनी कापूस पिकासाठी विमा अर्ज सादर केले होते. यामध्ये सिरोंचा तालुक्यात सर्वाधिक ५४९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यानंतर चामोर्शी तालुक्यातील ३७१, तर अहेरी तालुक्यातील ६८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

तालुकानिहाय शेतकरी संख्या आणि विमा संरक्षित क्षेत्र पुढीलप्रमाणे -

तालुका    शेतकरी संख्या    विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टर)
सिरोंचा ५४९ ६२२.०५
चामोर्शी ३७१ ३६१.५८
अहेरी ६८ १०६.६३
एकूण    ९८८    १,०९०.२६

या आकडेवारीवरून सिरोंचा तालुक्यातील कापूस उत्पादकांचा पीक विमा योजनेतील सहभाग सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होते. मात्र, विमा अर्ज दाखल करूनही नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा न झाल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

सहा कोटी ४३ लाखांचे विमा संरक्षण -
मागील हंगामात कापूस पिकासाठी शेतकऱ्यांच्या वाट्याचा १ लाख ६० हजार ८११ रुपये ८ पैसे इतका विमा हप्ता नोंदविण्यात आला होता. त्यापोटी कापूस पिकाला एकूण ६ कोटी ४३ लाख २५ हजार २१२ रुपये ५६ पैसे इतके विमा संरक्षण उपलब्ध झाले होते.

मात्र, विमा संरक्षणाची रक्कम निश्चित असणे आणि प्रत्यक्ष नुकसानभरपाई मंजूर होणे या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. संबंधित विमा कंपनीकडून मंजुरीची यादी अद्याप प्रशासनाला प्राप्त झालेली नसल्याने पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती भरपाई मिळणार, याबाबत स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे विमा संरक्षण असूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.

मंडळनिहाय निकषांमुळे वैयक्तिक नुकसानग्रस्त शेतकरी अडचणीत -
पीक विमा भरपाई निश्चित करताना संबंधित महसूल मंडळातील पीक नुकसान आणि योजनेतील लागू निकष विचारात घेतले जातात. त्यामुळे एखाद्या महसूल मंडळात एकूण नुकसान निर्धारित निकषांपेक्षा कमी नोंदविले गेले, तर त्या मंडळातील काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक स्तरावर मोठे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळण्यात अडचणी येऊ शकतात.

अशाच प्रकारे जिल्ह्यातील काही महसूल मंडळांमधील धान उत्पादक शेतकरीही पीक विम्याच्या लाभापासून वंचित राहिल्याची माहिती आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना मंडळनिहाय निकषांमुळे त्याला भरपाई मिळत नसेल, तर अशा शेतकऱ्यांच्या समस्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.

जिल्ह्यात १६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड -
गडचिरोली जिल्ह्यात यंदा सुमारे १६ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी कापूस पिकावर आर्थिक उत्पन्नासाठी अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास पीक विमा हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आर्थिक आधार ठरतो.

मात्र, मागील हंगामातील नुकसानभरपाईचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याने विमा योजनेच्या कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. विमा कंपनीकडून मंजुरीची यादी प्रशासनाला कधी उपलब्ध होणार, पात्र शेतकऱ्यांची भरपाई कधी निश्चित होणार आणि प्रत्यक्ष रक्कम खात्यात कधी जमा होणार, याकडे आता ९८८ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विमा उतरवूनही भरपाईसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने संबंधित विमा कंपनी आणि कृषी विभागाने या प्रकरणातील प्रलंबित कार्यवाही स्पष्ट करून पात्र शेतकऱ्यांना भरपाईबाबत माहिती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






  Print






Related Photos