महत्वाच्या बातम्या

 रात्री उशिरापर्यंत विनापरवानगी डीजेचा दणदणाट : तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : सण-उत्सवाच्या नावाखाली ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना हरताळ फासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात डीजे वाजविणाऱ्यांविरुद्ध रामनगर पोलिसांनी कारवाई केली. निर्धारित वेळेचे उल्लंघन करून तसेच आवश्यक परवानगीशिवाय डीजे वाजविल्याप्रकरणी डीजे मालकासह सर्वोदय शारदा महिला मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत डीजेची उपकरणे आणि वाहन असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२१ ऑक्टोबर रोजी देवी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गस्त घालत होते. यावेळी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास आदर्श पेट्रोल पंपामागे, इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील कबरा इंजिनिअरिंगसमोर मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एमएच ३४ बीझेड २८२७ क्रमांकाच्या वाहनावर बसविण्यात आलेल्या डीजे साऊंड सिस्टीमवर मोठ्या आवाजात संगीत सुरू असल्याचे आढळले. ध्वनिमापक यंत्राद्वारे आवाजाची तीव्रता तपासली असता ती ९३.३५ डेसिबल असल्याचे निष्पन्न झाले. ही तीव्रता निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक होती. संबंधितांकडे डीजे वाजविण्याची आवश्यक परवानगी नसल्याचे आणि रात्रीच्या विहित वेळेचे उल्लंघन झाल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले.

या प्रकरणी सरकारी फिर्यादी सहायक पोलीस निरीक्षक सचिन राखोडे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १२०१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३८ व १३६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपींमध्ये अनिकेत अरविंद उईके २३ वर्षे रा. घटाटोकी, ता. जि. चंद्रपूर डीजे मालक व चालक, ममता बाबुराव कविकुलवार ४२  वर्षे अध्यक्ष, सर्वोदय शारदा महिला मंडळ, इंडस्ट्रियल इस्टेट, चंद्रपूर आणि दुर्गा राजू गोटाकोंडे ३५  वर्षे उपाध्यक्ष, सर्वोदय शारदा महिला मंडळ, इंडस्ट्रियल इस्टेट, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत NUMARK कंपनीचा मिक्सर ४५ हजार रुपये, NXOIDIO 801 मशीन ५० हजार रुपये, TUROYS उपकरण २० हजार रुपये  MT60 मशीन ५० हजार रुपये, AROS कंपनीचे बॅक्स/बेस मशीन २ लाख ४० हजार रुपये आणि एमएच ३४ बीझेड २८२७ क्रमांकाचे वाहन ७ लाख रुपये असा एकूण ११ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासोबतच सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. सण-उत्सव, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर करताना आवश्यक परवानगी घेणे, आवाज निर्धारित मर्यादेत ठेवणे आणि शासनाने ठरवून दिलेल्या वेळेचे पालन करणे बंधनकारक आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी विहित मुदतीनंतर मोठ्या आवाजात डीजे वाजवू नये. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक सचिन राखोडे, पोलीस उपनिरीक्षक भारत थिटे, पोलीस अंमलदार शंकर भोयर, योगेश्वर कोसरे यांनी सहभाग केले.





  Print






Related Photos