वाईन शॉपीचे शटर तोडून ६५ हजारांची रोकड लंपास : सीसीटीव्हीत चोरटा कैद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव परिसरातील नागपूर रोडवरील सीबीसी मॉल येथील मनोहर वाईन शॉपीला चोरट्याने लक्ष्य करत शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला आणि काउंटरमध्ये ठेवलेली अंदाजे ६५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. १२ ऑक्टोबरच्या रात्री दुकान बंद केल्यानंतर ते १३ ऑक्टोबरच्या सकाळी उघडण्यापूर्वीच्या वेळेत ही चोरी घडली. सकाळी दुकानाचे शटर अर्धवट उघडे आणि लॉक तुटलेल्या अवस्थेत दिसल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला.
वाईन शॉपीचे मालक सचिन संजय बेरडे यांनी नेहमीप्रमाणे १२ ऑक्टोबर रोजी रात्री दहाच्या सुमारास दुकानाचा हिशोब केला. दिवसभराच्या व्यवहारातील एक लाख ४४ हजार रुपये सोबत घेतल्यानंतर उर्वरित अंदाजे ६५ हजार रुपये काउंटरमध्ये ठेवून त्यांनी दुकानाचे शटर बंद करून लॉक केले. त्यानंतर ते व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांसह घरी निघून गेले. मात्र, दुसऱ्याच दिवशी सकाळी दुकानात चोरी झाल्याची बातमी समोर आल्याने त्यांना धक्का बसला.
१३ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास दुकानातील कर्मचारी जितेंद्र गणवीर याने फोन करून शटरचे लॉक तोडून शटर अर्धवट उघडे असल्याची माहिती दिली. त्यानंतर बेरडे हे मित्रासह दुकानात पोहोचले. पाहणी केली असता काउंटरमध्ये ठेवलेली पाच रुपयांची नाणी तसेच ५० आणि १०० रुपयांच्या नोटा असा अंदाजे ६५ हजार रुपयांचा ऐवज गायब असल्याचे निदर्शनास आले.
दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक अनोळखी इसम चोरी करून जाताना दिसून आला.याप्रकरणी सचिन बेरडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा दराडे पुढील तपास करीत आहेत.




Petrol Price




