महत्वाच्या बातम्या

 धानपिकाला पाणी देताना ६५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण : पाण्याच्या वादातून काठीने हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाने पाठ फिरवली, त्यामुळे हाताशी आलेले धानपीक वाचवण्यासाठी पाण्याची धडपड सुरू असतानाच एका ६५ वर्षीय शेतकऱ्याला पाण्याच्या वादातून मारहाण झाल्याची घटना घडली. नांदेड शिवारात धानपिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या पुंडलीक तुकडू बोरकर यांना काठीने मारहाण करून जखमी केल्याची तक्रार तळोधी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या घटनेमुळे शेतीच्या पाण्यावरून होणाऱ्या वादांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पुंडलीक बोरकर हे धामनगाव चक येथील रहिवासी असून, त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. नांदेड शिवारातील गट क्रमांक ५५६ मध्ये त्यांची तीन एकर शेती आहे. या शेतात त्यांनी पावसाळी धानपिकाची लागवड केली आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकाला पाणी देण्याची चिंता त्यांना सतावत होती. धानपीक वाचवण्यासाठी ते डोबरा तलावाच्या नाल्यातील पाणी मोटारपंपाच्या साहाय्याने शेतात देत होते.

१९ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बोरकर हे आपल्या शेतालगत शेती असलेल्या बंडू मुकाजी गरडकर यांच्यासोबत पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी नांदेड येथील बालाजी मरापे आणि त्याच्यासोबत असलेले अन्य दोन जण तेथे आले. घोडाझरी नहराच्या मायनरचे पाणी अडविल्यामुळे आपल्या शेतीला पाणी मिळत नसल्याचा आरोप बालाजी मरापे याने केल्याचे बोरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

यावर नहराचे पाणी बंद असल्याने आपण ते कसे अडवणार, असा प्रश्न बोरकर यांनी उपस्थित केला. मात्र, या बोलण्यावरून वाद वाढला. तक्रारीनुसार, बालाजी मरापे याने बोरकर यांच्याशी झटापट करून शिवीगाळ केली आणि हातातील काठीने त्यांच्या कमरेखाली मारहाण केली. या हल्ल्यात बोरकर जखमी झाले असून, त्यांना वेदना होऊ लागल्या. यानंतर पुन्हा मायनरचे पाणी अडविल्यास मारहाण करण्याची धमकी देऊन संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

रात्रीची वेळ असल्याने आणि पोलिस ठाण्यात जाण्यासाठी वाहनाची सोय नसल्याने बोरकर यांना तत्काळ तक्रार दाखल करता आली नाही. अखेर २० ऑक्टोबर रोजी त्यांनी तळोधी पोलिस ठाण्यात धाव घेऊन संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. एकीकडे पावसाअभावी धानपीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, तर दुसरीकडे पाण्याच्या वादातून मारहाणीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढत आहेत.





  Print






Related Photos