अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू


- राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींची मोहोर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 19 दिवस झाले तरी नवीन सरकार स्थापन झालेले नाही. राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. अखेर राज्यपालांच्या शिफारसीवर राष्ट्रपतींनी मोहोर लावली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ ठऱली आहे.
राज्यपालांनी सुरुवातीला राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले होते. मात्र आवश्यक बहुमत नसल्याचे सांगत भाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी शिवसेनेला आमंत्रण दिले, मात्र बहुमताचे पत्र दाखवण्यासाठी फक्त 24 तास दिले. शिवसेना दिलेल्या वेळेस सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राजभवनावर पोहचली. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत मग्शूल असल्याने पाठिंब्याची पत्र वेळेत मिळाली नाही. शिवसेनेने वेळ वाढवून मागितली. मात्र राज्यपालांनी ही मागणी फेटाळली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राजभवनावर भेटीसाठी बोलावून सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आणि आज मंगळवार साडेआठ वाजेपर्यंतची वेळ दिली होती.
मंगळवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान राष्ट्रवादीने आम्ही आता आवश्यक संख्याबळ जमवू शकत नाही असे पत्र राज्यपालांना दिले. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती. अखेर सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान राष्ट्रपतींनी या शिफारसीला हिरवा कंदिल दाखवला. यामुळे राज्यातील राजकीय परिस्थितीची अनिश्चिततकडे वाटचाल सुरु असल्याचे दिसते.
  Print


News - Rajy | Posted : 2019-11-12


Related Photos