महत्वाच्या बातम्या

 शेती नांगरणीचा खर्च वाढला : ट्रॅक्टरला ताशी एक हजार रुपये मजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : खरीपपूर्व मशागतीची कामे हळूहळू सुरु होत आहेत. सध्या तापमान वाढल्याने शेतीकामांना जणू विश्रांतीच देण्यात आली आहे. मात्र हळूहळू मशागतीची कामे काही ठिकाणी होताना दिसून येत आहे.

यंदा मात्र डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरचे भाडे प्रतितास एक हजार रुपयांवर पोहोचले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यंदा सतत वातावरण बदल होऊन अवकाळी पाऊस बरसत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे शेतजमिनीत योग्य ओलावा निर्माण झाला आहे. खरीप व रब्बी पीक निघाल्यावर शेतकरी शेतजमीन नांगरणी करून ठेवत असतात. त्यामुळे नांगरणी केली जात आहे. सध्या शेतातील कामे सर्रास ट्रॅक्टरने केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांना गावात रोजगार उपलब्ध होऊन चार पैसे पदरी पडताना दिसून येत आहेत. रब्बी हंगाम संपल्यावर शेतातील पाऱ्या, धुऱ्याची दुरुस्ती करीत असतात.

सकाळच्या सुमारास शेतशिवारात ट्रॅक्टरचे सूर कानी पडत आहेत. मात्र डिझेलच्या दरवाढीने ट्रॅक्टरने नांगरणी करणे अनेक शेतकऱ्यांच्या अवाक्याबाहेर झाले आहे. प्रतितास एक हजार रुपये भाडे द्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. नांगरणीचे दर वाढल्याने काही शेतकरी बैलजोडीच्या साहाय्याने कामे करीत आहेत. काही शेतकरी कापूस पिकाची लागवड केलेल्या शेत जमिनीची साफसफाई करून नांगरणी योग्य शेतजमीन तयार करताना दिसून येत आहेत. यांत्रिकीकरणामुळे शेती महागली, अशी प्रतिक्रिया साखरा येथील पुंजिराम डोईजड या शेतकऱ्याने व्यक्त केली.

उत्पादन तेवढेच खर्च मात्र वाढला -

यांत्रिकीकरणाच्या पूर्वी शेती मशागतीचा खर्च कमी होता. त्यामुळे उत्पादन थोडे कमी झाले तरी शेतकरी आर्थिक अडचणीत येत नव्हता. आता मात्र यांत्रिकीकरणामुळे शेतीचा खर्च भरमसाठ वाढला आहे. हा खर्च भरून निघण्यासाठी १०० टक्के उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यामुळेच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतीच्या एकूण उत्पादनाच्या जवळपास ८० टक्के खर्च होते. जेमतेम २० टक्के नफा मिळते. त्यातही उत्पादनात घट झाल्यास मोठा फटका संबंधित शेतकऱ्याला सहन करावा लागते. शेतीतील यांत्रिकीकरणामुळे उत्पादन खर्च भमसाठ वाढला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos