२५ वर्षांच्या इतिहासात पोलिस दलाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे विक्रमी मतदानासह निर्विघ्न पार पडल्या निवडणूका


- विधानसभा निवडणूक शांततेत
- पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: मागील २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच गडचिरोली पोलिस दलाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. पोलिस दलाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे निवडणूकांदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात विक्रमी ७०.२६  टक्के मतदान झाले असून मतदानात जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे, ही बाब अभिमानास्पद आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज २५ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस विभागाने केलेल्या कामगिरीबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, दुर्गम भागातील आदिवासी जनेतेने नक्षलवादाला न जुमानता लोकशाहीवर आपला विश्वास दाखविला आहे. आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान केले आहे. विशेष म्हणजे नक्षल्यांनी बॅनर, पोस्टरबाजी करून अनेक भागातील आदिवासी जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये मलमपोड्डूर व परिसरातील जनतेने नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळून नक्षल्यांचा निषेध केला होता. या परिसरात ६३.६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच जिल्ह्यातील अनेक भागातील नागरीकांनी नक्षल्यांच्या आवाहनाला पायदळी तुडवून मतदान केले आहे. यामुळे नागरीकांच्या मनात नक्षल्यांबद्दल असलेली चिड पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे, असेही पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले.

आचारसंहीतेच्या काळात झाल्या ३ चकमकी

विधानसभा निवडणूकीची आचारसंहीता लागल्यापासून पोलिस दल सतर्क होते. या काळात सी - ६० जवानांनी मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी अभियान राबविले. यादरम्यान जिल्ह्यात ३ चकमकी उडाल्या. तसेच नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने पुरून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा पोलिसांना आढळून आला. यामध्ये ४ बंदुका, गावठी बनावटीचे १४  हॅन्डग्रेनेड, १४ टु इंच मोटारचे सेल, १२ डीटोनेटर काॅरेडेक्स, जिलेटीन १० कि.ग्रॅ., गन पावडर १ कि.ग्रॅ. तसेच दैनंदिन वापराच्या साहित्यांचा समावेश आहे. सी - ६० कमांडोंनी लांब पल्ल्याचे व आखुड पल्ल्याचे प्रभावी अभियान राबविल्यामुळे निवडणूका निर्विघ्नपणे पार पडण्यास मदत झाली, असेही पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले. 

दुर्गम मतदान केंद्रांना जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी दिली भेट

पोलिस मुख्यालयापासून तब्बल २६५ किमी अंतरावर असलेल्या दुर्गम भागातील पातागुडम येथील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी शेखर सिंह व पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मतदनाच्या काही दिवस आधी भेट दिली. यावेळी स्थानिक नागरीकांशी चर्चा करून मतदानात सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले. यामुळे नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि या केंद्रावर तब्बल ८२.२६  टक्के मतदान झाले.
१ मे रोजी कुरखेडा तालुक्यातील लवारी जवळ नक्षल्यांनी भुसुरूंग स्फोट घडवून आणले होते. यामुळे लवारी हे गाव देशभरात चर्चेत आले. या गावातील काही नागरीकांनी नक्षल्यांच्या भुलथापांना बळी पडत भुसुंरूंग स्फोट घडविण्यास मदत केली होती. यामुळे पोलिसांनी गावातील अनेकांना अटक केली. नक्षली स्वतःच्या फायद्यासाठी आपला वापर करीत असल्याचे नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरीकांनी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची भेट घेवून  पोलिस दलाची लिखित स्वरूपात माफी मागितली होती. त्याचबरोबर यापुढे नक्षल्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, याची ग्वाही दिली होती. प्रत्येक निवडणूकीत लवारी मतदान केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव मरारटोला येथे हलविण्यात येत होते. मात्र यावेळी लवारी येथील ग्रामस्थांचा प्रतिसाद बघता पोलिस अधीक्षकांनी लवारी येथेच मतदान केंद्र निश्चित केले. यामुळे उत्तम प्रतिसाद देत ८०.८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
पोलिस मुख्यालयापासून २२० किमी अंतरावर असलेल्या अतिसंवेदनशिल व अतिदुर्गम मेंढरी येथील बुथ सुरक्षेच्या कारणावरून नेहमीच पिपली बुर्गी किंवा जवेली येथे हलविण्यात येत होते. मात्र यावेळी ग्रामस्थांचा उत्साह पाहता मतदान केंद्र हलविण्यात आले नाही. मागील २५ वर्षांच्या काळात प्रथमच गावात ६३.९९  टक्के मतदान झाले आहे.

निवडणूकीच्या कार्यात १३ हजार ५०० जवानांनी घेतली मेहनत

जिल्हा नक्षलग्रस्त असल्याचे लक्षात घेत पोलिस दलासह विविध सुरक्षा दलाचे जवान जिल्ह्यात तैनात करण्यात आले होते. तब्बल १३ हजार ५०० जवानांनी मतदानाच्या काळात जिल्ह्यात कर्तव्य पार पाडले.

दुर्गम भागातील मतदान पथके ने - आण करण्यासाठी हेलिकाॅप्टरचा वापर करण्यात आला. कर्मचाऱ्यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या ३ एम.आय. १७  आणि दोन पवनहंसच्या हेलिकाॅप्टरची मदत घेण्यात आली. यामुळे दुर्गम भागात मतदान पथके पोहचविणे शक्य झाले.

३८० आत्मसमर्पीत नक्षल्यांनी बजावला मतदानाचा हक्क

एकेकाळी नक्षल दलममध्ये राहून नक्षल्यांच्या मनसुब्यांमध्ये सहभागी झालेल्या व लोकशाही न मानणाऱ्या  ३८० आत्मसमर्पीत नक्षल्यांनी विधानसभा निवडणूकीत मतदान केले. आत्मसमर्पीत नक्षल्यांनी उत्साहात मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला.

दारूबंदी कायद्यान्वये २३७ गुन्हे दाखल, ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिस विभागाने लक्षलवादासोबतच जिल्ह्यातील इतरही अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली होती. निवडणूका दारूमुक्त पार पाडण्यासाठी पोलिस दलाने पथके तैनात केली होती. निवडणूकीच्या काळात दारूबंदी कायद्यान्वये एकूण २३७ गुन्हे दाखल करण्यात आले तर २३ हजार ६८१ लीटर दारू जप्त करण्यात आली. सोबतच ३०६ आरोपींकडून ७६ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिआरपीसी कायद्यानुसार एकूण ३९० जणांवर तर मुंबई पोलिस कायद्यानुसार १०४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. 

गडचिरोली पोलिस दताले निवडणूक नियोजनबध्दरीत्या पार पाडताना मागील एक वर्षांपासून दुर्गम भागातील जनतेसाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, शांतता रॅली आदी माध्यमातून नाविण्यपूर्ण योजना राबविल्या. दुर्गम व अतिदुर्गम भागात जनतेसह शहरी भागातील जनतेच्या मनामध्ये गडचिरोली पोलिस दलाच्या प्रती विश्वास निर्माण होण्यास मदत मिळाली. त्याचबरोबर गडचिरोली पोलिस दलाने देखील निवडणूकीच्या  काळात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली. जनतेने नक्षलवाद्यांनी मतदान न करण्याच्या आवाहनाला न जुमानता भरघोस मतदान केले. यातून नक्षलवाद्यांना दुर्गम भागातील जनता पूर्णपणे विरोध करीत असल्याचे व लोकशाहीवर दृढ विश्वास असल्याचे दिसून येते. 
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मतदानात नागरीकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले आहे. निवडणूका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्रांचे अधिकारी, कर्मचारी, सी - ६० जवान व निवडणूक कार्यात महत्वाची जबाबदारी बजावलेल्या पोलिंग पार्टीमधील कर्मचार्यांचे  अभिनंदन केले आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-25


Related Photos