निकाल अवघ्या काही तासांवर, उत्सूकता शिगेला : उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये दावे - प्रतिदावे


- अनेकांची डिपाॅझीट जप्त होणार 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
राज्यात महिनाभरापासून सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीला उद्या पूर्णविराम मिळणार आहे. सोमवार २१ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडल्यानंतर उद्या २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८  वाजतापासून उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार असून राज्यभरात उत्सूकता शिगेला पोहचली आहे. सर्वच उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते निवडूण येण्याबाबत दावे - प्रतिदावे करीत आहेत तर काही ठिकाणी अतिउत्साही कार्यकर्त्यांनी उमेदवारांच्या अभिनंदनाचे बॅनरसुध्दा लावल्याच्या घडामोडी आज दिवसभर घडत आहेत.
निवडणूक आयोगाने निवडणूक जाहिर केल्यापासूनच निवडणूकीत मोठ्या प्रमाणात चुरस दिसून येत होती. अनेक घडामोडी झाल्या. पक्षांतर झाले. उमेदवारी मिळविण्यासाठी धडपड झाली. अनेक पक्षांमध्ये बंडखोरीही झाली. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. अनेकांनी अपक्ष निवडणूक लढविली. आता उद्या या सर्वच घडामोडींचा निकाल लागणार आहे. 
सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी आपण जिंकणार असा दावा केला आहे. कार्यकर्तेसुध्दा गुलाल उधळणारच, अशा विश्वासावर आहेत. मात्र जीव तोडून दावे करणाऱ्या अनेक उमेदवारांचे डिपाॅझीटही उद्या जप्त झालेले असेल. काही उत्साही उमेदवार व कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारीसुध्दा करून ठेवली आहे. ढोल - ताशा पथके, डिजे आरक्षित करून ठेवल्याचीही माहिती आहे. काही उमेदवारांनी भव्य मिरवणूकांचेही नियोजन केले आहे. मात्र कोणाला मिरवणूकीत मिरविण्याची संधी भेटते आणि कोण पराभव मान्य करतो, याकडे संपूर्ण मतदारांचे  व देशवासीयांचे लक्ष लागले आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-23


Related Photos