२४ ऑक्टोबरकडे जनतेचे लक्ष, महायुतीला बहुमत मिळाल्यास विरोधक ईव्हीएमवर खापर फोडणार!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
काल २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान पार पडले. आता २४ ऑक्टोबर  रोजी असलेल्या निकालाकडे संपूर्ण राज्य तसेच देशाचे लक्ष लागले आहे. काल मतदान पार पडल्यापासून मिडीयावर एक्झीट पोल झळकू लागले. या सर्व एक्झीट पोलमध्ये महायुतीला बहुमत मिळत असल्यामुळे आता सर्वचजण निकालाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र युतीला बहुमत मिळाल्यास विरोधकांकडून ईव्हीएमवर खापर फोडले जाण्याची दाट शक्यता आहे.
देशात आधी बॅलेट पेपरवर निवडणूका घेतल्या जात होत्या. मात्र आता ईव्हीएममशीनद्वारे मतदान घेण्यात येत आहे. ईव्हीएमद्वारे होत असलेल्या प्रत्येक मतदानावर देशात कुठे ना कुठे आक्षेप घेतल्या जात आहे. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा तसेच त्यानंतरही झालेल्या निवडणूकांमध्ये महायुतीने बहुमत मिळविले. यामुळे साहजिकच विरोधकांचा रोष ईव्हीएमवर राहिला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीनंतरही विरोधकांनी ईव्हीएमचा मुद्दा उचलला होता. निवडणूक आयोगाकडे निवेदन करीत बॅलेट पेपर वर निवडणूका घेण्याची मागणी करण्यात आली. देशातील अनेक पक्ष एकत्र येवून ईव्हीएमचा विरोध करीत आहेत. मात्र निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करणे किंवा मतदान बदलविणे शक्य नसल्याने पारदर्शक निवडणूका होत असल्याच्या मतावर ठाम आहे. तरीही ईव्हीएमबाबत ओरड सुरूच आहे.
२०१४ पासून भाजप सत्तेत आल्यापासून विरोधी पक्ष पाहिजे त्या प्रमाणात सक्रीय असल्याचे दिसून आले नाही. तसेच विविध पक्षांमध्ये अंतर्गत गटबाजी आहे. या निवडणूकीच्या वेळीही जागावाटप करताना विविध  पक्षांच्या नेत्यांमध्ये मत्तांतरे दिसून आले. बंडखोरी झाली. यामुळे साहिजिकच याचा परिणाम मतदानावर पडतो. 
गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात डोकावून पाहिल्यास जिल्ह्यात कोणताही विरोधी पक्ष पाच वर्षात आक्रमक दिसून आला नाही. कोणतेही मोठे आंदोलन झाले नाही किंवा कोणत्याही घडामोडी होताना दिसल्या नाहीत. रस्त्यांची दुरवस्था असतानाही कोणताही विरोधी पक्ष आवाज उठविला नाही.   उलट पक्षांतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आली. शहरात तसेच जिल्ह्यात असंख्य समस्या असतानाही विरोधी पक्षांनी कुठल्याही समस्येवर ब्र काढला नाही किंवा प्रशासनाला धारेवर धरले नाही. केवळ निवडणूका आल्या की लोकांपर्यंत जाण्याचे काम करण्यात आले. याउलट सत्तेतील भाजपाच्या लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी केलेली कामे गावा - गावांपर्यंत पोहचविण्याचे काम केले, लोकांमध्ये जनसंपर्क ठेवला. यामुळे पक्ष गावा - गावापर्यंत पोहचत राहिला.
सध्या सोशल मिडीयावर ईव्हीएमसंदर्भात विविध बातम्या येउ लागल्या आहेत. निवडणूकीत ईव्हीएमचा गैरवापर करून सत्ता काबिज केल्या जात असल्याचा आरोप होउ लागला आहे. यामुळे निकाल एक्झीट पोलप्रमाणे लागल्यास नकीच ईव्हीएमवर खापर फोडण्यात येणार आहे. ईव्हीएमवर खापर फोडण्याऐवजी स्वतःच्या पक्षांतर्गत कलह, जनतेपर्यंत जाण्याची वृत्ती याकडे लक्ष द्यावे, असे मत अनेकजण व्यक्त करताना दिसून येत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-22


Related Photos