श्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वैरागड:
‘श्रावण मासी हर्ष माणसी, हिरवळ दाटे चोहिकडे’ या बालकवींच्या कवितेची आठवण करून देणारा श्रावण महिना काल ११ आॅगस्टपासून सुरू झाला आहे. निसर्ग सौंदर्याची उधळण करीत येणार्या महिन्यात सर्वत्र भक्तीमय वातावरण असते. सोबतच या महिन्यात महत्वाच्या सणांची मेजवानीसुध्दा असते. मंदिरांमध्ये तसेच घरोघरी भजन, पुजनाचे आयोजन केले जाते. यामुळे हा महिना हर्षाेल्हासात साजरा होतांना दिसून येतो.
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो. त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. या महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. श्रावण महिन्यात प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पुजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैन धर्मियांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. 
या महिन्यात प्रत्येक दिवशी भजन, पुजनाचे आयोजन केले जाते. गडचिरोली जिल्ह्यातसुध्दा हा महिना भक्तीमय असतो. या महिन्यात बहूतांश लोक मांसाहारी जेवन घेत नाहीत. सध्या सर्वत्र भजनांची रेलचेल दिसून येत आहे. वैरागड येथील हनुमान मंदिरात काल ११ आॅगस्ट रोजी श्रावण मासानिमित्त भजनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आबालवृध्दांसह सर्वच जण भक्तीभावाने सहभागी झाले होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-12


Related Photos