ऐन दिवाळीपूर्वी बँक कर्मचाऱ्यांची २२ ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
  सरकारी बँकांच्या ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) व बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया (बीईएफआय) या बँक कर्मचारी संघटनांनी  ऐन दिवाळीपूर्वी, २२ ऑक्टोबरला देशव्यापी संपाची हाक दिली आहे.  सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा व मुदत ठेवींवरील घटत्या व्याजदराचा निषेध करण्यासाठी संप पुकारत असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. मात्र उर्वरित सात संघटनांनी या संपाला पाठिंबा दिला नसल्याने बँकांच्या कामकाजावर फार परिणाम होणार नाही, अशी शक्यता आहे. या सात कर्मचारी संघटनांमध्ये तीन संघटना या कर्मचाऱ्यांच्या तर, चार संघटना अधिकाऱ्यांच्या आहेत.
एआयबीईए आणि बीईएफआय या संघटनांत आमच्या बँकेचे फार कमी कर्मचारी असल्याने या संपाचा आमच्या बँकेच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, असे स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. बँक ऑफ महाराष्ट्र व सिंडीकेट बँकेने मात्र या संभाव्य संपाबाबत चिंता व्यक्त केली आहे. या संपामुळे ग्राहकसेवेवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. या संपादरम्यान बँकेचे कामकाज सुरळीच रहावे यासाठी आम्ही पुरेशा उपाययोजना करत आहोत. मात्र हा संप यशस्वी ठरला तर आमच्या शाखांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे सिंडीकेट बँकेने म्हटले आहे. बँक अधिकाऱ्यांच्या संघटनेने गेल्या महिन्यात २६ व २७ तारखेला संपाची हाक दिली होती. मात्र सरकारच्या आश्वासनानंतर हा संप मागे घेण्यात आला.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-19


Related Photos