महत्वाच्या बातम्या

 चारा साक्षरता व संवर्धन अभियान जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची पूर्वतयारी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या कमी पर्जन्यमानामुळे आणि खरीप पिकांच्या उत्पादनावर पडलेल्या प्रतिकूल परिणामांमुळे आगामी काळात पशुधनासाठी हिरवा तसेच वाळलेला चारा मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संभाव्य चाराटंचाई ओळखून त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने चारा साक्षरता व संवर्धन अभियान हाती घेण्यात आले आहे.

या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पशुपालकांना चाऱ्याचे योग्य नियोजन, संवर्धन आणि उपलब्ध चाऱ्याचा पुरेपूर व कार्यक्षम वापर करण्याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये चाऱ्याचे जतन करणे, पिकांच्या अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावरील विविध प्रक्रिया, मुरघास निर्मिती तसेच पर्यायी चारा उत्पादन यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे.

अभियानाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक गावोगावी जाऊन पशुपालकांच्या बैठका, मेळावे व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करतील. याशिवाय पत्रके, माहिती फलक, रेडिओ, डिजिटल माध्यमे, व्हॉट्सॲप समूह आणि लघुपटांच्या साहाय्याने प्रचार-प्रसार केला जाणार आहे.

स्थानिक परिस्थिती आणि उपलब्ध संसाधनांचा मेळ घालत कमी खर्चात चारा उत्पादन घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, तसेच चाऱ्याचे सुयोग्य नियोजन करून संवर्धनाच्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करावा, असे आवाहन पशुसंवर्धनच्या जिल्हा उपायुक्तांनी केले आहे.





  Print






Related Photos