महत्वाच्या बातम्या

 तेंदुपाने तोडाईची मजुरी मिळवून द्या हो : ग्रा. पं. मल्लमपोडूर वासियांची आर्त हाक


- पत्रकार परिषद घेऊन मांडल्या व्यथा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / भामरागड : तालुक्यातील ग्राम पंचायत मल्लमपोडूर अंतर्गत येणाऱ्या नऊ गावांतील लोकांचे पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी तेंदुपानाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे तेंदुपानाच्या मजुरीचे पैसे कुणीतरी मिळवून द्या हो अशी आर्त हाक पत्रकार परिषदेत दिली.

दरवर्षी उन्हाळ्याच्या मे महिन्यात सर्वत्र तेंदुपत्ता तोडाईचे काम चालते. येथील भोळ्याभाबड्या जनतेचा आर्थिक बजेट तेंदुपाने तोडाईवरच अवलंबून असतो. वर्षभर याच पैशांच्या आशेवर जनता उधारीवर सामान खरेदी करतात, शेती करतात. मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्य जपतात. मात्र यावर्षी पाच महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अजूनही तेंदुपत्ता तोडाईच्या मजूरीचे पैसे कंत्राटदारांने दिले नाही. त्यामुळे येथील जनता आर्थिक विवंचनेत आहे. दुकानदार उधारीच्या पैशांसाठी तगादा लावत आहेत. काहींनी तर यावर्षी पैशांअभावी शेती  केली नाही. आता वर्षभर जगायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून उभा ठाकला आहे.

यावर्षी अली ट्रेडर्स तर्फे मोहम्मद अश्रफ अली मु.खाजिपूरा ता.जगीत्याल जि.करीमनगर या तेलंगणातील कंत्राटदारांनी ग्राम पंचायत मल्लमपोडूर‌‌‌ अंतर्गत येणाऱ्या मल्लमपोडूर, कुक्कामेटा, हिन्देवाडा, ईरपनार, मुरंगल, भुसेवाडा, पिट्टेकसा, सुंदरनगर, मुसपाडी या नऊ गावांत तेंदुपाने तोडाईचा कंत्राट घेतला होता. त्यासाठी पेसाअंतर्गत ग्रामकोष समिती व कंत्राटदार यांच्यात करारनामा झाला. मे महिन्यात तेंदुपाने तोडाईचे काम सुरू झाले. जूनमध्ये बोद (गोणी) भरती केली. सर्व गावांतील बोद संकलित करुन चंद्रपूर जिल्ह्यातील राजोली येथील गोडाऊन मध्ये जमा करण्यात आले. कंत्राटदाराला वारंवार पैशांची मागणी करण्यात आली. तेंदुपाने तेंदुफळीवर दिल्यापासून कंत्राटदारानी सात दिवसांचे आत संकलनाची मजूरी अदा करावी लागेल असे करारनाम्यात नमुद आहे. वारंवार मजूरीची मागणी करुनही पैसे मिळाले नाही. त्यामुळे पोलीसांना सुद्धा पैसे मिळवून देण्यासाठी निवेदन देण्यात आले. कंत्राटदारानी १८ आगष्टपर्यंत मजूरी देण्याचे स्टॅंम्प पेपरवर लिहून दिले.संवर्ग विकास अधिकारी भामरागड, यांचेकडे सुद्धा निवेदन दिले. मात्र अजूनही मजूरी मिळाली नाही. कंत्राटदाराला फोन केला असता फोन लागत नाही. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे? आमची मजूरी त्वरीत न मिळाल्यास नऊही गावांतील लोक आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच सर्वच निवडणुकीवर बहिष्कार घालू असा निर्वाणीचा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. पत्रकार परिषदेत ग्राम कोषसमिती मल्लमपोडूरचे अध्यक्ष लच्छुराम कुम्मा दुर्वे, भुसेवाडाचे सुखराम मासा मिच्चा, ईरपनारचे संजय तिरसा गावडे, हिन्देवाडाचे जुरु बय्या मुहूंदा, कुक्कामेटाचे लालसू पोरिया कुरसामी, मुरंगलचे गोंगलू पुसू महाका, सुंदरनगरचे भास्कर पोट्टी ईष्टाम, टी.पी.चे सचिव मनोहर लालसाय सडमेक, सरपंच रोशन रामा वड्डे, प्रशिष्टीत नागरिक रामा कुल्ले वड्डे तसेच नऊही गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मल्लमपोडूरवासियांची तेंदुपाने तोडाईची मजूरी मिळाली नसल्याची तक्रार १५ जून २०२२ला मला प्राप्त झाली.मी लगेच त्याच दिवशी संबंधित कंत्राटदार व ग्रामसभा यांना पत्र पाठवून सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र गावकऱ्यांनी दिलेल्या कंत्राटदाराचे पत्त्यावर पत्र पाठवले ते परत आले. तसेच जिल्ह्यातील वरिष्ठांनाही यासंबंधीची माहिती पाठवली. कंत्राटदार न आल्यामुळे सुनावणी झाली नाही.    

- स्वप्निल मगदुम

- संवर्ग विकास अधिकारी, पं.स. भामरागड





  Print






News - Gadchiroli




Related Photos