नाडेकल, बेतकाठी व प्रतापगढ येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्काराचा पावित्रा !


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / कोरची : 
प्रशासकीय कामकाज सोयीचे व्हावे व नागरिकांना सर्व सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात  याकरिता कुरखेडा तालुक्यापासून कोरची तालुक्याची निर्मिती करण्यात आली. मात्र अद्यापही या तालुक्यातील नागरिक विकासाच्या वाटेपासून दूरच आहेत. याचे  जिवंत उदाहरण म्हणजे  नाडेकल, बेतकाठी व प्रतापगढ ही गावे. या गावांनी आपल्या मागण्या निकाली निघत नसल्यामुळे मतदानावर बहिष्काराचा पावित्रा घेतला आहे. 
१९९२ मध्ये कुरखेडा पासून कोरची तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा तत्कालीन प्रशाश्कीय अधिकाऱ्यांनी नाडेकल, बेतकाठी व प्रतापगढ ही गावे कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट केले आणि पंचायत समितीचे कार्यालय  सुद्धा कुरखेडा हेच देण्यात आले. विशेष बाब म्हणजे तहसील कार्यालय कोरची ला देण्यात आले आहे. परिणामी येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या कामकाजाकरिता  खोब्रामेंढा, पंचायत समितीच्या कामकाजाकरिता  कुरखेडा तर तहसील कार्यालयातील कामकाजाकरिता  कोरची गाठावे लागत असल्याने प्रचंड आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ येथील नागरिकापर्यंत वेळेवर पोचत नसल्याने नागरिक विकासाच्या संकल्पनेपासून कोसोदूर आहेत. विद्यार्थ्यांचे विविध दाखले वेळेवर मिळत नसल्याने त्यांचा सुद्धा भ्रमनिरास होत असून प्रशासनाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाडेकल, बेतकाठी व प्रतापगढ येथील संतप्त  नागरिकांनी तहसील कार्यालय गाठले व येत्या विधानसभेच्या निवडणुकीवर बहिष्कार करणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी आचार संहीता संपल्यावर आपल्या स्तरावरून पाठपुरावा करण्याचे आश्वासन नायब तहसीलदार  नारनवरे यांनी दिले. यावेळी कोरची तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष शामलाल मडावी, धनीराम हिडामी, नाजूकराम नैताम, सुखदेव आचला तसेच  मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-12


Related Photos