महत्वाच्या बातम्या

 प्लॅस्टिकविरोधी कारवाई जोरात : सहा महिन्यांत ३५ लाखांचा दंड वसूल


- १७ जणांविरोधात कायदेशीर कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी पालिका जुलैपासून प्रतिबंधित प्लॅस्टिकवर जोरदार कारवाई करीत आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांत ३ हजार ८१३ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले असून तब्बल ३४ लाख ८५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शिवाय १७ जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
आरोग्याला घातक आणि पावसाळय़ात अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचण्याला कारणीभूत ठरणाऱ्या ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबईत २६ जुलै २००५ मध्ये आलेल्या महापुराला याच पिशव्या कारणीभूत ठरल्या होत्या. त्यामुळे २०१८ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे; मात्र कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत ही कारवाई थंडावली होती. मात्र गेल्या १ जुलैपासून ही कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मॉल, बाजार, दुकाने, फेरीवाले अशा ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

हॉटेलमधील पार्सलसंदर्भात लवकरच निर्णय
प्रतिबंधित प्लॅस्टिकमध्ये खाद्यपदार्थ, जेवण पार्सलसाठी वापरण्यात येणाऱ्या डब्यांचाही समावेश होतो. या प्लॅस्टिकवरही पालिका कारवाई करणार आहे. यासाठी आहार सारख्या हॉटेलचालक संस्थांसोबत बैठक घेऊन तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत लवकरच कार्यवाही सुरू होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

या प्लॅस्टिकवर आहे बंदी
५० मायक्रॉन प्लॅस्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हँडल असलेल्या व नसलेल्या, प्लॅस्टिकपासून बनवण्यात येणाऱ्या व एकदाच वापरून टाकून दिल्या जाणाऱ्या (डिस्पोजेबल) वस्तू उदा. ताट, कप, प्लेट, ग्लास, चमचे इत्यादी; हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकच्या वस्तू, द्रव्य पदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे कप / पाऊच, सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्यादी साठवण्यासाठी व पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक आणि प्लॅस्टिक वेष्टन यांचा समावेश आहे.





  Print






News - Rajy




Related Photos