वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गांधी-शास्त्री जयंती उत्साहात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सत्य, अहिंसा, साधेपणा आणि देशभक्तीचा संदेश देत वैभव कॉन्व्हेंट स्कूलमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्याप्रगती एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून दोन्ही राष्ट्रीय नेत्यांच्या विचारांना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक हेमंत मानकर, संस्थापिका रझिया खान, प्राचार्य विजय शिंदे, व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख व शबिस्ता सय्यद यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर भाषणे केली. त्यांच्या विचारांचा आणि देशासाठीच्या योगदानाचा परिचय विद्यार्थ्यांनी करून दिला. यासोबतच देशभक्तीपर नृत्य आणि नाट्य सादरीकरणातून राष्ट्रीय भावना जागृत करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यावर आधारित आकर्षक चित्ररथ विद्यार्थ्यांनी तयार केला होता. या चित्ररथातून गांधीजींच्या जीवनातील प्रसंग तसेच सत्य आणि अहिंसेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
प्राचार्य विजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गांधीजी आणि शास्त्रीजी यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. सत्य, अहिंसा, स्वच्छता, प्रामाणिकपणा, साधेपणा, कठोर परिश्रम आणि देशभक्ती ही मूल्ये जीवनात अंगीकारल्यास विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होईल, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका राखी तुमराम तसेच विद्यार्थिनी प्रणवी तांद्रा आणि अलीशबा पठाण यांनी केले. शिक्षिका रिंकू चौधरी यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रमाला उत्साहाचे वातावरण लाभले.




Petrol Price




