काॅंग्रेसकडून गडचिरोली विधानसभा क्षेत्रात डाॅ. चंदा कोडवते, आरमोरीतून आनंदराव गेडाम यांचे नाव निश्चित


- रात्री उशिरापर्यंत अधिकृत घोषणा होणार
- आमदार विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली
: काॅंग्रेसकडून गडचिरोली विधानसभा क्षेत्रासाठी डाॅ. चंदा नितीन कोडवते तर आरमोरी विधानसभा क्षेत्रासाठी माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे नाव निश्चित झाले आहे. रात्री उशिरापर्यंत दोन्ही उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती काॅंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. 
पत्रकार परिषदेला काॅंग्रेसचे नेते, डाॅ. चंदा कोडवते, बंडोपंत मल्लेलवार, जि.प. सदस्य ॲड. राम मेश्राम, जि.प. सदस्या कविता भगत, जि.प. सदस्या कोतपल्लीवार, डाॅ. नितीन कोडवते, युवक काॅंग्रेसचे अतुल मल्लेलवार आदी उपस्थित होते. 
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस तसेच मित्र पक्षांच्या उमेदवार म्हणून डाॅ. चंदा कोडवते यांना उमेदवारी देण्याबाबत काॅंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा झाली. सोनिया गांधी यांनी महिला सन्मान म्हणून उच्च विद्याविभुषीत डाॅ. चंदा कोडवते यांच्या नावाला संमती दिली आहे. 
भाजपाने विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिली आहे. मात्र भाजपा आणि आमदारांप्रती सध्या जनतेमध्ये रोष आहे. ५ वर्षात एकही चांगले काम विधानसभा क्षेत्रात झाले नाही. विधानसभा क्षेत्राची अधोगती झाली आहे. पाच वर्षांत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नागरीकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. सिंचनाचे एकही मोठे प्रकल्प भाजप सरकारने आणले नाही. चिचडोह बॅरेज हा प्रकल्प काॅंग्रेसच्याच काळातील आहे. तसेच कोटगल बॅरेजलासुध्दा काॅंग्रेसनेच प्रशासकीय मान्यता दिली होती. नवीन प्रकल्प आणण्यात विद्यमान आमदारांना अपयश आले. 
सरकारने शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष केले. केवळ १५ टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रूपये देण्याची घोषणा केली. मात्र केवळ ५ टक्के लोकांना याचा लाभ मिळाला. बेरोजगारांची फसवणूक केली. सुरजागड प्रकल्पाची पायाभरणी केली मात्र पाच वर्षात साधी विटही रचण्यात आली नाही. जिल्ह्यातील आरोग्य सेवा कोलमडली आहे. रूग्णालयांची दुरावस्था, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आहे. नगर परिषदेचा कारभार एकहाती असतानाही शहराची अवस्था बकाल झाली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला बगल देण्यात आली यामुळे सरकारप्रती रोष असून काॅंग्रेसला नक्कीच यश मिळेल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-10-01


Related Photos