महत्वाच्या बातम्या

 वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्यस्तरीय कृषि पुरस्काराकरिता निवड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : राज्यात कृषि, कृषि संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सन 2020, 2021 व 2022 करिता विविध कृषि पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली, यामध्ये वर्धा जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांना कृषि पुरस्कार जाहीर झाला आहे.

पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांमध्ये हिंगणघाट येथील प्रगतिशील शेतकरी रतनलाल दादाजी बोरकर यांना सन 2022 चा उद्यान पंडित पुरस्कार, बाबापूर ता. समुद्रपूर येथील शेतकरी दिपक ज्ञानेश्वर बर्डे यांना सन 2021 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार, नंदोरी ता. समुद्रपूर येथील शेतकरी रवींद्र वसंतराव वैद्य यांना सन 2022 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार तसेच सिंधी रेल्वे येथील महिला शेतकरी कुसुम प्रमोद झाडे यांची सन 2021 च्या जिजामाता कृषिभूषण पुरस्काराकरिता निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर यांच्याहस्ते शाल व श्रीफळ देऊन सहकुटुंब गौरविण्यात आले.

हिंगणघाट तालुक्यातील रतनलाल दादाजी बोरकर हे पारंपरिक शेती सोबत फलोत्पादन विषयक पिकांचे उत्पादन घेतात. सेंद्रिय पद्धतीने फळपिकांचे उत्पादन घेत असून उत्पादित पिके निंदणीकरण, पॅकिंग करून स्वतः विक्री करत आहेत. त्यासोबतच श्री. बोरकर हे एकात्मिक पीक व्यवस्थापन, मूलस्थानी जलसंधारण, कमी खर्चित पीक अछादन या सारख्या तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. त्यांनी केलेल्या कामाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून त्यांना सन 2022 चा उद्यान पंडित पुरस्कार जाहीर झाला आहे.

समुद्रपूर तालुक्यातील शेतकरी दीपक ज्ञानेश्वर बर्डे व रवींद्र वसंतराव वैद्य यांची वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्काराकरिता निवड झाली. दिपक ज्ञानेश्वर बर्डे हे बाबापुर येथील शेतकरी असून सेंद्रिय पद्धतीने पारंपारिक पिकांबरोबर ज्वारी, जवस, राळा, नाचणी, धुडिंग यासारख्या विविध अन्नधान्य पिकांचे उत्पादन घेत आहे. श्री बर्डे यांच्याकडे विविध पिकांचे 160 वाणांची संग्रही बीज बँक असून यांच्या कार्याची दखल घेऊन सन 2012 साली डॉ. एम. एस. स्वामिनाथन फाउंडेशन, चेन्नई यांनी फेलोशिप प्रदान केली आहे. शेतातील उत्पादित सेंद्रिय कृषि उत्पादने जसे गहू, हरभरा, ज्वारी यांची विक्री करतात तसेच विविध पिकांचे देशी वाणांच्या बियाण्यांची देखील विक्री करतात. या कार्याची दखल घेत कृषि विभागामार्फत वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार सन 2021 करिता निवड करण्यात आली आहे.

समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील प्रगतिशील शेतकरी रवींद्र वसंतराव वैद्य शेतामध्ये प्रामुख्याने हळद या पिकाचे  उत्पादन घेत असून एकात्मिक पिक व्यवस्थापन या तंत्राचा प्रभावी वापर करून विविध प्रयोग करत आहेत. सिंचनाकरिता त्यांनी स्वखर्चातून चेक डॅमची निर्मिती केली आहे. पाण्याचे एकात्मिक व्यवस्थापन करुन आपल्या शेतातील पाण्याची पातळी वाढविली आहे. हळद पिकाचे बियाणे बनविण्याची अभिनव पद्धत विकसित केली आहे. गावातील शेतकरी यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन, सेंद्रिय निविष्ठा यांचा प्रभावी वापर करणे, कृषि विभागाच्या माध्यमातून आयोजित शेतीशाळा, प्रशिक्षण, प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमात सहभाग नोंदवितात याची दखल घेऊन त्यांना वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार सन 2022 जाहीर झाला आहे.

सेलू तालुक्यातील सिंधी रेल्वे येथील प्रगतिशील महिला शेतकरी कुसुम प्रमोद झाडे या मागील 32 वर्षापासून शेती करतात. शेतामध्ये विविध भाजीपाला पिकाची जसे पालक, मेथी, सांभार, फुलकोबी, पत्ताकोबी, वांगी, टोमॅटो, कांदा, लसूण, कारले, दोडका, बीट, गाजर, मुळा, चवळी इत्यादी लागवड सेंद्रिय पद्धतीने करतात. उत्पादित मालाची स्वतः स्थानिक बाजारपेठेत विक्री करतात तसेच पपई, पेरू, सीताफळ इत्यादी फळपिकाची लागवड करून भरघोस उत्पन्न घेतात. शेतातच गांडूळ खत निर्मिती तसेच निंबोली अर्क, दशपर्णी अर्क निर्माण करुन वापरतात. विविध ठिकाणी आयोजित कृषि प्रदर्शन, कृषि महोत्सवांना तसेच कृषि विज्ञान केंद्राला भेटी देऊन नवनवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा आपल्या शेतात उपयोग करतात याच कार्याची दखल घेऊन त्यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार सन 2021 जाहीर झाला आहे.





  Print






News - Wardha




Related Photos