महत्वाच्या बातम्या

 शेतकऱ्यांना ई-पॅास मशिनद्वारे रासायनिक खतांचा पुरवठा


-  जिल्ह्याला १ लाख मेट्रीक टन खताचे आवंटन

-  १०० कृषी केंद्रांवरून होणार खतांचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतकऱ्यांना निर्धारीत दराने आणि मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा व्हावा, खत वितरणातील गैरप्रकार दुर व्हावेत आणि विक्रीचे आकडे जुळावेत यासाठी शासनाने खतांचा पुरवठा ई-पॅास मशिनद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यावर्षी या प्रणालीद्वारे खते उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यासाठी कृषी विभागाने १ लाखावर रासायनीक खतांचे आवंटन मंजूर केले आहे.

शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणावर खतांची आवश्यकता भासत असते. शासन शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जिल्ह्यांना खतांचा पुरवठा उपलब्ध करून देत असतो. ही खते शेतकऱ्यांना अनुदानावर उपलब्ध करून दिली जाते. त्यासाठी केंद्र शासन खत उत्पादक कंपन्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करून देत असते.

येत्या खरीप हंगामात जिल्ह्याला १ लाख ७ हजार ११५ मेट्रीक टन रासायनीक खतांचे आवंटन मंजूर होणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत आणि निर्धारत दरात खतांचा पुरवठा व्हावा, पुरवठ्यात गैरप्रकार होऊ नये आणि विक्रीचे व्यवहार जुळावे यासाठी ई-पॅासद्वारे खरेदी करणे अत्यंत महत्वाचे आहे. या मशिनद्वारे खरेदी केल्यास नेमका पुरवठा व साठा याची आकडेवारी जुळते. खतांची मागणी व पुरवठा याचे संतुलन राखून खत टंचाईवर मात करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील मशिनद्वारेच खरेदी करणे आवश्यक आहे.

ई-पॅास मशिनद्वारे खरेदी करतांना आधार क्रमांक आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी खरेदीसाठी आधारकार्ड सोबत नेणे आवश्यक आहे. सर्व कृषी केंद्र चालकांना मशिनद्वारेच खते विक्री करण्याचे बंधन आहे. त्यामुळे कुठे मशिनशिवाय खरेदी होत असल्यास आणि तशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास संबंधित चालकांवर कारवाई देखील केली जाणार आहे. असा प्रकार आढळल्यास शेतकरी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तक्रार नोंदवू शकतात.

खरेदीची पावती जपून ठेवा

शेतकऱ्यांनी खत खरेदी करतांना अधिकृत विक्रेत्यांकडून पावती घेऊनच करावे. खरेदी पावती पिकांची कापणी होईपर्यंत जपून ठेवावी. भेसळीची शंका दुर करण्यासाठी खतांची पाकीटे व गोणी सिलबंद, मोहोरबंद असल्याची खात्री करावे. कमी वजनाच्या निविष्ठा किंवा छापील किंमतीपेक्षा अधिक दराने विक्री होत असल्यास जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos