पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा 'हार्य अलर्ट' वर : जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : 
संजय सरोवर,धापेवाडा आणि पुजारी टोला धरणाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठांवरील गावांना पुरस्थितीचा धोका निर्माण झालेला आहे. भंडारा शहरालगतच्या वैनगंगा नदीवरील कारधा पुलावरून पाणी प्रवाहीत होऊन मार्ग बंद झाला. शहरातील  ग्रामसेवक कॉलनीत पाणी शिरले आहे. जिल्हयात पुरस्थिती कायम असून या पुरस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी  शासकीय यंत्रणा "हाय अलर्ट" वर ठेवण्यात आलेली  आहे. जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी  १० सप्टेंबर २०१९ ला सायंकाळी ६ वाजता पुरस्थितीबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाची तातडीची बैठक बोलावून पुरस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी  उपाययोजना करणे व नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी शासकीय विभागांना अलर्ट राहण्याचे निर्देश दिले.
सदर सभेस  मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपविभागीय अधिकारी, भंडारा डॉ श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधु, तहसिलदार अक्षय पोयाम  तहसिलदार पवनी गजानन कोकर्डे, तहसीलदार मोहाडी धनंजय देशमुख, कार्यकारी अभियंता गोसेखुर्द मानवटकर, कार्यकारी अभियंता धपेवाडा, मुख्याधिकारी भंडारा ज्ञानेश्वर  ढेरे, कार्यकारी अभियंता भंडारा पाटबंधारे विभाग व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास उपस्थित होते.
सध्या पाण्याची पातळी कमी होत असली तरी तातडीच्या उपाययोजनाची आपली तयारी असावी. भंडारा शहरातील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी पाण्याची पातळी एक ते दोन मीटरने खाली जाणे आवश्यक आहे. तथापी पाणी पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था तयार ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
कारधा पुलावरील पाण्याची पातळी उद्या सकाळपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. कारधा येथील सहा कुटुंबाना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले आहे. गोसेची पाणी पातळी २४५ मीटर पर्यंत स्थिर ठेवण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. ४५ लाईफ जॅकेट आहेत. तातडीच्या वेळी मागणी केल्यास ती उपलब्ध राहतील. २ बोट उपलब्ध असून त्याचा पण उपयोग करण्यात यावा, असे ते म्हणाले.  पाणी पातळीत वाढ होत असताना वैनगंगा नदीच्या आजूबाजूला असलेल्या गावांचा वीज पुरवठा याबाबत सतर्कता बाळगावी, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. औषधी साठा उपलब्ध ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाला देण्यात आले.

यंत्रणांनी सतर्क रहावे -पालकमंत्री
पूर परिस्थिती व वैनगंगा नदीची वाढणारी पाणी पातळी पाहता आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने सतर्क रहावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी या बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना  दूरध्वनीद्वारे दिल्या.  Print


News - Bhandara | Posted : 2019-09-11


Related Photos