नैसर्गिक समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज : नगराध्यक्षा योगिता पिपरे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
दिवसेंदिवस निसर्गाचा समतोल बिघडत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्यावतीने ५०  कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेतली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून वृक्षारोपण करून निसर्गाचा समतोल राखणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा योगिता पिपरे यांनी केले.
संताजी सोशल क्लबच्यावतीने आयोजित संताजी स्मृती प्रतिष्ठान गडचिरोलीच्या आवारात नगराध्यक्षा योगिता पिपरे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा योगिता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून संताजी क्लबचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, कार्यकारी अध्यक्ष राजू इटनकर, सचिव गोपीनाथ चांदेवार, उपाध्यक्ष ॲड. कुनघाडकर, नगरसेवक तथा संचालक प्रमोद पिपरे, सुरेश भांडेकर, गजानन कुकडकर, लाकडे, संदीप बाळेकरमकर, निवृत्ती शेंडे, कोलते, दलाल, विठ्ठल कोठारे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अर्थ, नियोजन, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर ५०  कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून संताजी सभागृहात एकूण १०० झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. तसेच संताजी क्लबचे अध्यक्ष प्रा.देवानंद कामडी, कार्यकारी अध्यक्ष राजु इटणकर, सचिव गोपीनाथ चांदेवार, उपाध्यक्ष  ॲड. कुनघाडकर व सर्व संचालक मंडळाचा अभिनंदन करून संताजी सोशल क्लब चांगले सामाजिक कार्य करीत आहे,  असेही नगराध्यक्षा पिपरे म्हणाल्या. यावेळी संताजी सोशल क्लबचे संचालक मंडळ, पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-22


Related Photos