सफाई कामगार संघटनेचे नेते छगन महातो यांच्याकडून स्वार्थासाठी मजूरांना हाताशी धरून नगर पालिकेस वेठीस धरण्याचे काम


- नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहराची साफसफाई करून शहरात स्वच्छता राखणे हे नगर परिषदेचे आद्य कर्तव्य आहे. याकरीता पालिका प्रशासन सक्षम आहे. मात्र अखिल भारतीय सफाई मजदूर काॅंग्रेस कामगार संघटनेचे अध्यक्ष छगन महातो हे कंत्राटदाराकडून नेमलेल्या कामगारांना हाताशी धरून नाहक नगर परिषदेस वेठीस धरण्याचे काम करीत असल्याची माहिती नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी स्थानिक नगर परिषदेत आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे. पत्रकार परिषदेला न.प. उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, नगरसेवक प्रमोद पिपरे, केशव निंबोड उपस्थित होते.
पुढे माहिती देताना मुख्याधिकारी ओहोळ म्हणाले, साफसफाईच्या कंत्राटातील मजूर नगर परिषदेचे कायम, रोजंदारी आणि मानधनावरचे मजूर नाहीत. कंत्राटदाराने सफाईच्या कामावर कोणाला ठेवावे अथवा ठेवू नये याचा अधिकार कंत्राटदाराचा आहे. नगर परिषदेचा नाही. कंत्राटदाराचे कर्मचारी हे कायमस्वरूपी आहेत असे भासवून छगन महातो हे पत्रकार परिषद घेउन कंत्राटदारांच्या कंत्राटी मजूरांना भडकावून त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रूपये वसूल केले आहेत. याद्वारे ते स्वतःचा हित साधत असल्याचेही ओहोळ म्हणाले. कंत्राटी मजूरांना मोहरा बनवून पालिका प्रशासनावर दबाव आणून साफसफाईच्या कामात अडथळे आणल्या जात आहे. तसेच नागरीकांच्या आरोग्याशी खेळल्या जात आहे. याबाबत नगराध्यक्षांनी सफाई आयोगाकडे तक्रारही दाखल केली आहे. 
शहराची साफसफाई करण्याच्या दिलेल्या कंत्राटावर कंत्राटदाराने कामावर लावलेल्या कंत्राटी कामगारांची महातो दिशाभूल करीत आहेत. कामात व्यत्यय आणून प्रशासनास वेठीस धरणाऱ्या प्रवृत्तींवर कारवाईचे धोरण मुख्याधिकाऱ्यांनी अवलंबिले आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत सफाई कामगार संघटनेचे नेते छगन महातो  व त्यांना मदत करणाऱ्या पालिकेतील कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशीही माहिती मुख्याधिकारी ओहोळ यांनी दिली आहे. 
३१ डिसेंबर २०१८ रोजी शहर सफाईचे जुने कंत्राट संपले असून कंत्राट संपण्याआधी पालिकेने ऑक्टोबर २०१८ मध्ये अंदाजपत्रक तयार केले. २२ नोव्हेंबर २०१८ रोजी तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूरकडे सादर केला. यानंतर १९ डिसेंबर २०१८ रोजी तांत्रिक मान्यता प्राप्त होताच प्रशासकीय मान्यतेसाठी २७ डिसेंबर २०१८ रोजी प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला. १२ फेब्रुवारी २०१९ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडून रिक्षाघंटागाडीची प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र नाली सफाईची प्रशासकीय मान्यता अमान्य करण्यात आली. १० मार्च २०१९ पासून ३१ मे २०१९ पर्यंत लोकसभा निवडणूकीची आचारसंहीता असल्यामुळे यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. 
घनकचरा संकलनासाठी जानेवारी २०१९ मध्ये ऑटो टिप्पर आल्यामुळे व ऑटो टिप्परचा खर्च पूर्वीच्या अंदाजपत्रकात समाविष्ट नसल्यामुळे एप्रिल २०१९ ला सुधारीत अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मान्यतेकरीता ३० एप्रिल २०१९ रोजी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चंद्रपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. ६ जुलै २०१९ रोजी तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी १९ जुलै रोजी जिल्हाणिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर १९ जुलै रोजीच प्रशासकीय मान्यता मिळाली. जानेवारी २०१९ ते १५ ऑगस्ट २०१९ पर्यंत सभेने वेळोवेळी सदर कामाची मुदतवाढ दिलेली होती. २० जुलै पासून १४ ऑगस्ट पर्यंत ई निविदा प्रक्रिया पार पाडली. पात्र निविदा ५ टक्के कमी दराची आल्यामुळे पात्र नवीन कंत्राटदारांना १५ ऑगस्ट रोजी कामाच्या करारनाम्याबाबत पालिकेने पत्र दिले. करारनामा पूर्ण होताच नवीन कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात येईल व कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल. अशाप्रकारे पालिकेने केलेली कारवाई पारदर्शक असून प्रशासकीय अडचणीमुळे नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यास विलंब झाला आहे. मात्र छगन महातो हे स्वतःच्या स्वार्थासाठी कंत्राटी मजूरांना हाताशी घेउन जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील नगर परिषदांना वेठीस धरून पालिका प्रशासनावर दबाव आणत आहेत. यामुळे महातो यांच्यापासून सबंधित नगर परिषदेचे मुख्याधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच नागरीकांनीही सावध रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी संजीव ओहोळ यांनी पत्रकार परिषदेतून केले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-19


Related Photos