महत्वाच्या बातम्या

 नापिकीने हिरावला शेतकऱ्याचा आधार; मारडा येथे ५२ वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ज्या काळ्या मातीत आयुष्यभर कष्टाचे बीज पेरले, त्याच शेतात एका शेतकऱ्याची जीवनयात्रा संपल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना मारडा येथे घडली. सततच्या नापिकीच्या संकटाला कंटाळून ५२ वर्षीय मनीष रघुनाथ माकोडे यांनी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने मारडा परिसरात शोककळा पसरली असून शेतकरी वर्गातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

मनीष माकोडे हे मारडा येथील रहिवासी होते. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मौजा मारडा येथील शेतात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक चौकशीत सततच्या नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

माकोडे यांच्या नावावर मारडा येथे ०.८०, १.०० आणि २.६९ असे एकूण ४.४९ हेक्टर आर जमीन आहे. प्राथमिक तपासात त्यांच्या नावावर कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, शेतीत सातत्याने येणाऱ्या अपयशामुळे ते विवंचनेत होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.

या घटनेने माकोडे कुटुंबाचा आधारच हिरावला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मंगल, मुली जानवी व गौरी, आई पारवताबाई रघुनाथ माकोडे आणि दोन भाऊ असा परिवार आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेतकऱ्याच्या या दुर्दैवी मृत्यूने पुन्हा एकदा शेतीसमोरील संकटे आणि नापिकीच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.





  Print






Related Photos