पर्लकोटा नदीला पूर, जुना पूल पाण्याखाली गेल्याने ६०-७० गावांचा भामरागड मुख्यालयाशी संपर्क तुटला!

- पर्लकोटा पुलाजवळ पोलिसांचा बंदोबस्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : मुसळधार पावसामुळे भामरागड परिसरातील पर्लकोटा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. नदीला आलेल्या पुरामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १३०-डी (NH-130D) वरील पर्लकोटा नदीचा जुना पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. खबरदारीचा उपाय आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली असून, पुलाच्या बाजूंला पोलीस बंदोबस्त तैनात करून बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.
हा मुख्य मार्ग बंद झाल्यामुळे भामरागड तालुक्यातील तब्बल ६० ते ७० गावांचा उर्वरित जिल्ह्याशी संपर्क तुटला असून मागील दोन दिवसांपासून भामरागड आणि परिसरात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पर्लकोटा नदी रौद्ररूप धारण करत आहे. पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगाने वाढत असून पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. जुना पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक ठप्प झाली आहे. कोणतीही जीवितहानी किंवा अनचित प्रकार घडू नये यासाठी भामरागड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुलाच्या टोकांला बॅरिकेट्स लावले असून चोख बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांना पुलाजवळ न जाण्याचे आणि पुराच्या पाण्यातून प्रवास न करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
६०-७० गावे संपर्काबाहेर, जनजीवन विस्कळीत पर्लकोटा नदीचा हा पूल भामरागड तालुक्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. मात्र, हाच मुख्य रस्ता बंद झाल्यामुळे परिसरातील सुमारे ६० ते ७० गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे या भागातील दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांना, विशेषतः रुग्णांना आणि आपत्कालीन गरजा असलेल्या लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागनार आहे.




Petrol Price




