९ ऑगस्टला विदर्भवाद्यांचा वीज मंत्र्यांच्या घरावर 'वीज व विदर्भ मार्च'


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सर्वाधिक ६ हजार ३०० मेगाॅवॅट वीज विदर्भात निर्माण होते. विदर्भाला फक्त २ हजार २०० मेगाॅवॅट वीज दिली जाते. उर्वरीत ४ हजार १०० मेगाॅवॅट वीज पुणे, मुंबईकडे पुरविली जाते. असे असतानाही विदर्भातील ग्राहकांवर वेगवेगळे भार आकारून लुट केल्या जात आहे. याला विरोध करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने ९ ऑगस्ट रोजी राज्याचे ऊर्जा मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरावर 'विशाल वीज व विदर्भ मार्च' काढण्यात येणार आहे. नुकतेच विजेच्या समस्यांना घेऊन  १ ऑगस्ट रोजी प्रत्येक तालुक्यात  वीज कार्यालयासमोर वीज बिलाची होळी व धरणे आंदोलन  करण्यात आले.
विदर्भात वीज निर्मिती होत असताना सुध्दा वीज वहन आकार १.२८ रूपये प्रति युनिट, इंधन समायोजन आकार ०.५०  पैसे प्रति युनिट, स्थिर आकार व वेगवेगळे अधिभार विदर्भातील जनतेच्या माथी मारून १०० युनिटला ६.५० रूपये प्रति युनिट तर ५०० युनिटला १४ रूपये प्रति युनिट प्रमाणे वीज कंपनीकडून सर्वसामान्य जनतेवर भुर्दंड लादल्या जात आहे. व्यापारी आणि औद्योगिक विज दर यापेक्षाही जादा आहेत. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वास्तविक रिडींग न घेता पंप वापरात नसतानासुध्दा त्यांना सरासरी अवास्तव विज बिल पाठविले जात आहेत. विदर्भातील सर्व जनतेचे घरगुती, व्यापारी आणि औद्योगिक वापराचे विज दर निम्मे करण्यात यावेत, शेतकर्यांचे कृषी पंपाचे विज बिल माफ करण्यात यावे, ग्रामीण भागातील लोड शेडींग पूर्णपणे बंद करून २४ तास संपूर्ण दाबाची वीज पुरविण्यात यावी, विदर्भातील प्रदुषणयुक्त वीज प्रकल्प कमी करून विदर्भ प्रदुषणमुक्त करण्यात यावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. 
 आंदोलनाची सुरुवात संविधान चौकातून होणार आहे. या आंदोलनात वीज ग्राहक, शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक, विदर्भ प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, अशोक पोरेड्डीवार, उपाध्यक्ष शालिक नाकाडे, रमेश उप्पलवार, हनुमंत डंबारे, नाईक, महिला आघाडीच्या मनिषा तामसेटवार, मनिषा सजनपवार, युवा आघाडीचे सुरेश बारसागडे, एजाज शेख, बाळू मडावी, जिल्हा महासचिव गोवर्धन चव्हाण, देविदास मडावी, योगेंद्र नांदगाये, परशुराम सातार, चंद्रशेखर जक्कनवार, वामनराव जुवारे, पांडुरंग घोटेकर, चंद्रशेखर चडगुलवार, जगदिश बेद्रे, रघुनाथ तलांडे, मधुकर पुंगाटी, दीपक दुर्गे, मंदाताई तुरे, रियाज भाई, यशवंदा गावळे, अमिता मडावी, जाकीर नवाजीश अली आदींनी केले आहे.

 




  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-08-07






Related Photos