जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दर्शविला पाठिंबा


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केली आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आज ५ ऑगस्ट रोजी  जम्मू-काश्मीरबाबत ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया आली आहे. सातत्याने मोदी सरकारच्या निर्णयांवर टीका करणाऱ्या केजरीवाल यांनी केंद्र सरकारच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाला पाठिंबा दिल्याने त्यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जातेय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत जम्मू-काश्मीरच्या विभाजन करण्याची घोषणा करत त्या संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. यामध्ये त्यांनी कलम ३७० हटवण्याबाबतची माहिती दिली आहे. यासोबतच जम्मू काश्मीर राज्याची पुनर्रचना करण्याबाबतचा प्रस्तावही त्यांनी मांडला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीर व लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश होणार आहेत, तसंच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेचं अस्तित्वही कायम राहणार आहे. केजरीवाल यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, ”केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरबाबत घेतलेल्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे जम्मू-काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापीत होईल आणि वेगाने विकास होईल ही अपेक्षा आहे” असं म्हटलंय. ट्विटरद्वारे केजरीवाल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
  Print


News - World | Posted : 2019-08-05


Related Photos