महत्वाच्या बातम्या

 मागणीप्रमाणे संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना राबविणार : मंत्री गुलाबराव पाटील


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील ऊसतोड मजुरांच्या मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी व साखर कारखान्यावरील ऊस तोड मजुरांच्या बालकांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. जागेची उपलब्धता, ऊस तोड कामगारांची संख्या, लोकप्रतिनिधींची मागणी यानुसार राज्यात वसतिगृहे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधान परिषदेत दिली.

संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश करण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रवीण दटके यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते. या चर्चेत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, सदस्य गोपीचंद पडळकर, शशिकांत शिंदे, सचिन अहीर आणि रामदास आंबटकर आदिंनी सहभाग घेतला.

मंत्री पाटील म्हणाले, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने राज्यात ८२ वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण सहा वसतिगृहांचा समावेश आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात बीड,जालना अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड  कामगारांच्या मुला- मुलींसाठी प्रत्येकी शंभर विद्यार्थी क्षमतेच्या एकूण २० शासकीय वसतिगृहांपैकी मुलांसाठी ८ व मुलींसाठी ९ अशी एकूण १७ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जानेवारी २०२४ मध्ये वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी जागेची अडचणी येत असेल त्या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून भाड्याच्या जागेमध्ये वसतिगृह सुरू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos