सिएम चषक स्पर्धांच्या धर्तीवर महिलांसाठी 'शक्ती सन्मान महोत्सव'


- विविध उपक्रम राबविणार, मुख्यमंत्र्यांकडे मनोगत व्यक्त करण्याची महिलांना संधी 
- जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात सिएम चषक स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली. त्याचप्रमाणे महिलांचा विविध उपक्रमात सहभाग वाढविण्यासाठी राज्यात महिलांसाठी शक्ती सन्मान महोत्सव २१ जुलै ते १६ ऑगस्ट पर्यंत राबविण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांनी स्थानिक विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला भाजपा महिला आघाडी शक्ती सन्मान महोत्सवाच्या जिल्हा प्रभारी सविताताई पुराम, जि.प. अध्यक्षा तथा अहेरी विधानसभा प्रभारी योगिताताई भांडेकर, गडचिरोली च्या नगराध्यक्षा तथा गडचिरोली विधानसभा प्रभारी योगिताताई पिपरे, देसाईगंजच्या नगराध्यक्षा तथा आरमोरी विधानसभा प्रभारी शालुताई दंडवते, भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षा प्रतिभाताई चौधरी , आरमोरी तालुकाध्यक्षा संगिता रेवतकर, चामोर्शी तालुकाध्यक्षा माधवीताई पोरेड्डीवार, आदिवासी आघाडीच्या महिला जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, गडचिरोली न.प. च्या शिक्षण सभापती वर्षाताई बट्टे, नगरसेविका रंजना गेडाम, लताताई लाटकर, निता उंदिरवाडे, दुर्गा मंगर, निलिमाताई राउत, कविता उरकुडे, संघमित्रा खोब्रागडे, शहर सचिव गिता खोब्रागडे, ज्योती बागडे आदी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना जि.प. अध्यक्षा भांडेकर म्हणाल्या, भाजपाचे महिला संघटन मजबूत करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सदस्यनोंदणी, मतदार नोंदणी, रक्षाबंधन आदी कार्यक्रमांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे, ४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्याचे काम महिला आघाडी करीत आहे. भाजपा महिला मोर्चा आणि महिला कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी शक्ती सन्मान महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात ६५ जिल्हा संयोजिका आणि विधानसभास्तरीय २८८ संयोजिकांची नेमणूक करण्यात आली आहे. 
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील १ हजार ५०० महिलांना मुख्यमंत्र्यांचे पत्र देण्यात आले आहे. या महिलांकडून एक राखी आणि मुख्यमंत्र्यांना त्यांचे मनोगत असलेले एक पत्र पाठविले जाणार आहे. जिल्ह्यात एकूण १९ हजार ५०० शक्ती सन्मान कार्ड वितरीत केले जात आहेत. अशाप्रकारे राज्यातून २१ लाख राख्या आणि महिलांचे मनोगत असलेले कार्ड मुख्यमंत्र्यांना पाठविले जाणार आहेत. १६ ऑगस्ट रोजी मुंबई येथे शक्ती सन्मान अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून संयोजिका आणि चार महिला अशा एकूण ५ महिलांचा या कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, सैनिकाची पत्नी, शेतकरी महिला अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांचा सहभाग राहिल, अशी माहिती जि.प. अध्यक्षा योगिताताई भांडेकर यांनी दिली.
सविताताई पुराम म्हणाल्या, लोकशाहीत महिलांचा वाटा मोठा आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ६५ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे सरकारच्या कार्याप्रती महिलांनाही आपले मनोगत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविण्याची संधी देण्यात येत आहे. राज्य सरकारने राबविलेल्या योजनांबद्दल, मुख्यमंत्र्यांच्या कार्याबद्दल काय वाटते ते पोहचविण्याची संधी मिळणार आहे. मुंबई येथे होत असलेल्या कार्यक्रमाला तिनही विधानसभा क्षेत्रातून १८ महिला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पुराम यांनी दिली.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-30


Related Photos