तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-२ ची कक्षा बदलली, यान चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर


वृत्तसंस्था / श्रीहरीकोटा :  भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सोमवारी तिसऱ्यांदा यशस्वीरित्या चांद्रयान-२ ची कक्षा बदलली असल्याची माहिती ट्विटर वरून दिली असून चांद्रयान-२ चंद्रापासून आता फक्त तीन पावलं दूर आहे. कक्षा बदलाचा हा तिसरा टप्पा होता. चांद्रयान २ ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी चांद्रयान २ ची कक्षा बदलून पृथ्वीपासून २५१ किमी अंतरावर नेण्यात आले. सात सप्टेंबर रोजी चांद्रयान २ चंद्रावर उतरणार आहे.
२२ जुलै रोजी अवकाशात झेपावल्यानंतर ते पृथ्वीपासून किमान (पेरिजी) १७० किमी व कमाल (एपोजी) ४५ हजार १४७५ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले होते. आणखी दोन वेळा चांद्रयान २ च्या कक्षेमध्ये बदल करण्यात येणार आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान २ ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान २ मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता दोन आणि सहा ऑगस्टला हीच प्रक्रिया पुन्हा केली जाईल.   १४ ऑगस्टला चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. २० ऑगस्टला चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला विक्रम लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान २ चा प्रयत्न असेल.  Print


News - World | Posted : 2019-07-29


Related Photos