धक्कादायक ! वडिलांची अमानुषपणे हत्या करून मुलाने कुत्र्याला खाऊ घातले मांस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / यवतमाळ  :
शेतीच्या हिस्सेवाटणीच्या वादातून मुलाने जन्मदात्या वडिलांची अमानुषपणे हत्या केल्यानंतर वडिलांच्या मृत शरीराचे मांस कुत्र्याला खाऊ घातले. ही धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी झरी तालुक्यातील खापरी येथे उघडकीस आली. दरम्यान या अमानुष घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 
झरी तालुक्यातील खापरी येथील दत्तू उरवते व त्याचा मुलगा नामदेव यांच्यात शेतीच्या हिस्सेवाटणीतून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. नामदेवला शेतीमधील आपला वाटा हवा होता. मात्र, आपण जिवंत असेपर्यंत शेतीची वाटणी करावयाची नाही, असे दत्तू उरवते यांचे मत होते. त्यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत असे. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे मुलगा नामदेव याने वडील दत्तू व आईसोबत एकत्र जेवण केले. नंतर नामदेवचे आईवडील त्यांच्या खोलीत झोपायला गेले. मध्यरात्रीच्या सुमारास नामदेव याने वडिलांच्या डोक्यावर काठीने वार केले. यात दत्तू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतरही नामदेव हा त्यांच्यावर काठीने वार करीतच राहिला. त्यानंतर वडिलांचे मांस कुत्र्याला खाऊ घातले. या थरारक घटनेबाबत सकाळी गावकऱ्यांना माहिती होताच त्यांनी तातडीने पाटण पोलिसांना माहिती दिली. ठाणेदार अमोल बारापात्रे यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत आरोपी नामदेव याला अटक केली.   Print


News - Rajy | Posted : 2019-07-26


Related Photos