ट्रक चालकाला लुटणाऱ्या सहा आरोपींना २४ तासात अटक


- देसाईगंज पोलिसांची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
अर्जुनी मोरगाव - देसाईगंज मार्गावर देसाईगंजपासून ५ किमी अंतरावर टक थांबवून ट्रक चालक व क्लिनरला ट्रक खाली उतरवून टकच्या केबीनमधून १६  हजार रूपये लुटणाऱ्या  ६  आरोपींना देसाईगंज पोलिसांनी २४  तासात अटक केली आहे. 
रोहित हिरालाल रामटेके (२२) , अमोल राजेश मोटघरे (२४)  , नंदलाल लोटुराम वासनिक (३१) , विशाल महेंद्र खोब्रागडे (२४)  सर्व रा. भगतसिंग वार्ड देसाईगंज, विनोद काशिराम जुमनाके रा. तुकूमवार्ड देसाईगंज व पवन प्रकाश राहाटे (३१)  रा. भगतसिंग वार्ड देसाईगंज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून कार व लुटलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी ट्रक   चालक शिवारामादु शेषअन्ना मांगली (३८)  रा. शरीफनगर ता. कलुर जि. कानुल आंध्रप्रदेश हा २३  जुलै रोजी भिलाई छत्तीसगड येथून टक क्रमांक एपी २१  टीवाय ९३९३  ने लोखंडी वायर बंडल भरून आंध्रप्रदेशात अर्जुनी मोरगाव मार्गे निघाला. यानंतर २४  जुलै रोजी रात्री २.१५  ते २.३०  वाजताच्या सुमारास देसाईगंजपासून ५  किमी अंतरावर एक कार त्यांच्या ट्रक समोर उभी राहिली.  या कारमधून ५ ते ६  इसम खाली उतरले. या इसमांनी ट्रक चालक व क्लिनर ला काॅलर पकडून खाली उतरविले. यानंतर ट्रक च्या केबिनमधील १६  हजार रूपये घेवून ते कारने पसार झाले.  ट्रक च्या हेडलाईटमुळे निळ्या रंगाची मारूती सुझूकी कार क्रमांक एमएच ३१  - ७४४०  ही दिसून आली. ट्रक चालकाने तातडीने देसाईगंज पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तक्रार दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.
पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे यांच्यासह सहाय्यक फौजदार अशोक कराडे, पोलिस हवालदार लोमेश कन्नाके, नापोशि विजय नंदेश्वर, चालक शिपाई शंकर बंडे  यांनी देसाईगंज, ब्रम्हपुरी, लाखांदूर परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. घटनेत वापरलेली अल्टो कार देसाईगंज येथील नंदलाल वासनिक याची असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली. लागलीच वासनिक याला ताब्यात घेवून विचारपूस केली असता आरोपींची माहिती मिळाली. आरोपींना ताब्यात घेवून चैकशी केली. कार आणि रक्कम जप्त करण्यात आली. 
सदर कारवाई पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलिस अधीक्षक मोहित गर्ग यांच्या मार्गदर्शना पोलिस निरीक्षक प्रदिप लांडे व त्यांच्या पथकाने केली आहे.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-25


Related Photos