कवडजई येथे शेत बचाव अभियान व रब्बी हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे नियोजन, कमी पाण्यात घेता येणारी पिके, पीक संरक्षण, सेंद्रिय शेती तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती मिळावी, या उद्देशाने २८ ऑक्टोबर रोजी बल्लारपूर तालुक्यातील कवडजई येथे ‘शेत बचाव अभियान व रब्बी हंगामपूर्व शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून उपलब्ध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी रब्बी हंगामाचे नियोजन आणि कमी पाण्यात घेता येणाऱ्या रब्बी पिकांबाबत सविस्तर माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी बबन हराळ यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, महाडीबीटी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा टप्पा तसेच पीएमएफएमई (PMFME) योजनेची माहिती देऊन शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सहाय्यक कृषी अधिकारी घनश्याम टाले यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकावर पडणाऱ्या विविध किडी आणि रोगांची माहिती देत पीक संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा रवींद्र कन्नाके यांनी सेंद्रिय शेतीचे महत्त्व विशद करताना सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठा तयार करण्याच्या पद्धती आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा, याबाबत सविस्तर माहिती दिली.
पीएमएफएमई योजनेच्या प्रतिनिधी वानखेडे मॅडम यांनी शेतीला पूरक व्यवसाय सुरू करण्याच्या संधी, या योजनेतून मिळणारे लाभ तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या बँकविषयक कागदपत्रांची माहिती दिली. सहाय्यक कृषी अधिकारी बालाजी पवार यांनी सध्याच्या पीक परिस्थितीचा आढावा घेत पाणी फाउंडेशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य जुवारे होते. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा रवींद्र कन्नाके यांनी केले. त्यांनी उपस्थितांचे आभार मानल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.




Petrol Price




