महत्वाच्या बातम्या

 गोशाळांना चारा उत्पादनासाठी शासकीय पडीक जमिनी उपलब्ध करून द्या!


- आमदार किशोर जोरगेवार यांची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी; चारा व पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील गोशाळांना भेडसावणाऱ्या चारा आणि पाणीटंचाईच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासकीय पडीक जमिनी चारा उत्पादनाकरिता उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली. राज्य शासनाने गोशाळांना २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे अभिनंदनही केले.

१८ नोव्हेंबर रोजी आयोजित भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र विशेष बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी ऑनलाइन प्रणालीद्वारे सहभाग नोंदविला. यावेळी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संवाद साधत चंद्रपूर जिल्ह्यातील गोशाळांच्या विविध समस्यांकडे लक्ष वेधले. गोवंशाचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या संस्थांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली.

चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अनेक संस्था गोवंशाचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहेत. यामध्ये लोहार येथील उज्ज्वल गोरक्षण संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गोवंशाचे संगोपन केले जाते. मात्र, सध्या निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनावरांसाठी चारा आणि पाण्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यातच चाऱ्याच्या किमतीत वाढ झाल्याने गोशाळांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडत आहे.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका, वेकोली, वनविभाग आणि महसूल विभागाच्या मालकीच्या पडीक जमिनी गोशाळांना चारा उत्पादनासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी केली. या जमिनींवर चारा पिकांची लागवड करून जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याचे उत्पादन घेता येईल. तसेच उत्पादित चाऱ्याची साठवणूक केल्यास भविष्यातील टंचाईच्या काळातही त्याचा उपयोग होऊ शकतो. यामुळे गोशाळांना स्थानिक पातळीवर चारा उपलब्ध होऊन बाहेरून चारा खरेदी करण्यावरील आर्थिक खर्च कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य शासनाने गोशाळांना २५ लाख रुपयांचा निधी देण्याचा घेतलेला निर्णय गोवंश संवर्धनाच्या कार्याला आर्थिक बळ देणारा आहे. या माध्यमातून गोवंश संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या संस्थांना मदत मिळणार आहे. मात्र, केवळ आर्थिक मदत पुरेशी नसून गोशाळांना चारा आणि पाण्याची शाश्वत उपलब्धता करून देणेही तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. गोवंशाचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन हे सामाजिक जबाबदारीचे कार्य आहे. त्यामुळे गोशाळांना आवश्यक जमीन, चारा आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केला.





  Print






Related Photos