महत्वाच्या बातम्या

 राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता : या जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांत रविवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळला. दरम्यान, रविवारी हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंज तर काहींना यलो अलर्ट दिला होता.

आजही राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. राज्यात सोमवार आणि मंगळवारी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. अकोला, बुलडाणा, जालना, हिंगोली, वाशिम, परभणी या जिल्ह्यांमध्ये आजही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पालघर, मुंबई, ठाणे रायगड या भागातही आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आज बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर विदर्भात पावसाचा जोर कायम आहे. यवतमाळ जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाची रिपरिप सुरूच आहे. तसेच, ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात घट झाली असून, किमान मध्येही वाढ कायम आहे.

दरम्यान, हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वाऱ्यांच्या परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत आहे. राज्यासह, गुजरात, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्ये गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला आहे. पुढील २४ तासांतही या भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नैऋत्य अरबी समुद्रापासून सौराष्ट्र आणि कच्छ परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उत्तर मध्य प्रदेश आणि परिसरावरही चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होत असून, या वाऱ्याच्या प्रभावामुळे येत्या सोमवारी (ता. २७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची, तसेच बुधवारपर्यंत (ता. २९) त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.





  Print






News - Rajy




Related Photos