महत्वाच्या बातम्या

 चामोर्शीत तेली समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न


- ३०० वधू-वरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; विवाहयोग्य स्थळांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : द्वारकाप्रसाद सातपुते बहुउद्देशीय संस्थेच्या सौजन्याने स्थानिक इम्पेरियल मंगल कार्यालयात रविवारी १ नोव्हेंबर तेली समाज वधू-वर व पालक परिचय नोंदणी मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातून आणि परिसरातुन अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मेळाव्यात तब्बल १०० वधू-वरांची प्रत्यक्ष, तर २०० जणांची ऑनलाइन अशी एकूण ३०० जणांची नोंदणी करण्यात आली. या वेळी व्यासपीठावरून युवक-युवतींनी स्वतःचा परिचय करून दिला. यामुळे विवाहयोग्य वधू-वर आणि त्यांच्या पालकांना एकाच छताखाली योग्य स्थळांची माहिती मिळण्याचा सुवर्णयोग जुळून आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक तेली समाजाचे उपाध्यक्ष बाबुरावजी कोहळे (गडचिरोली) यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मार्कंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तथा सावतेली समाज, चामोर्शीचे सदस्य गजाननजी भांडेकर यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नगरपंचायत चामोर्शीचे उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, इम्पेरियल फंक्शन हॉलचे मालक चुडाराम सातपुते, एम. डी. चलाख, तुळशीदास कुनघाडकर, दौलतराम कोठारे, राधेश्याम घोंगडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

गडचिरोली जिल्ह्यातील तेली समाजातील शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवतींना एकत्र आणणे, एकाच ठिकाणी अनेक योग्य स्थळांची माहिती उपलब्ध करून देऊन पालक व तरुणांचा वेळ आणि खर्चाची बचत करणे, समाजातील परस्पर नाती अधिक घट्ट करणे आणि विशेषतः हुंडामुक्त विवाहाला प्रोत्साहन देणे, या प्रमुख उद्देशांमधून या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी द्वारकाप्रसाद सातपुते, अमोल कुकडकर, कृष्णा बोदलकर, द्रोणार्थ सातपुते, विवेक सातपुते, संतोष भांडेकर, जिजाबाई सातपुते, आशिष चलाख, उष्टुजी चलाख, यशवंत भांडेकर, दिलीप उडान, सुनील जुवारे, मोरेश्वर कोठारे, गोपिचंद बोदलकर, पवन सातपुते यांच्यासह समाजातील तरुण व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक द्वारकाप्रसाद सातपुते यांनी केले, सूत्रसंचालन शिक्षक गजानन बारसागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन गोपिचंद बोदलकर यांनी मानले.





  Print






Related Photos